Sushil Kumar Modi on maharashtra politics : बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil modi) यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish kumar) यांना इशारा देताना महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना का फोडली याचा मोठा खुलासा केला आहे. पण यामुळं भाजप (BJP) आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली आहे. होय.. आम्ही शिवसेना फोडली असं म्हणत भाजपने पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली आहे. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना आम्ही तोडलं, महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत होती. जेव्हा शिवसेनेनं धोका दिला तेव्हा त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला. असं म्हणत सुशील मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. परंतु मोदी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप मित्र पक्षांना संपवतो का? असा प्रश्न विचारला जातोय?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपवर अनेक आरोप करत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावर सुशील मोदी यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेचं उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलं की, "आम्ही कोणताही मित्रपक्ष तोडत नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडले आहे. जसे की महाराष्ट्र. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले."
राज्यात 1980 पासून भाजप आणि शिवसेना हातात हात घालून मोठी झाली, पण 2014 साली युती तुटली आणि दुरावा वाढत गेला. पण राज्यात कुणी कुणाला संपवलं यावरून कायम आरोप प्रत्यारोप होत राहिले. केंद्रात मोदी आणि शहा यांचा उदय झाला तेव्हापासून भाजपची एक हाती सत्ता आली आहे, अंकाच्या खेळात भाजपला मित्र पक्षांची गरज उरली नाही, त्यामुळं त्यांना दुय्यम स्थान मिळत गेलं, आता मात्र मित्रपक्ष संपवले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अनेक राज्यात भाजपपासून छोटे पक्ष दुरावले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तर याच मुद्द्याला धरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार म्हणाले की, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी भाषणात स्पष्ट सांगितले की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. नितीश कुमार यांची तक्रार आहे की, भाजप सोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. तो पक्ष त्यांनी जवळपास संपुष्टात आणला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भारतीय जनता पार्टीने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एकप्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते. नितिश कुमार हे लोकमान्यता असलेले नेतृत्व आहे.
विरोधकांनी भाजपवर आरोप केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आणि याच मुद्द्यावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर आणि शिवसेनेवर टीका केली. शरद पवारांच्या आरोपावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांचं दु;ख वेगळं आहे. भारतीय जनता पक्ष का कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलंय.
...त्यामुळे खरी शिवसेना आमच्यासोबत
बिहारमध्ये आमचे 75 लोकं निवडून आले. आणि जेडीयूचे 42 जण निवडून आले, तरीही आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं. बिहारमध्ये आज नाही, तर उद्या भाजपची सत्ता येईल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष कधीही मित्रपक्षाला धोका देत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. काल राज्याच्या मंत्रीमंडळाची स्थापना झाली. शिवसेनेचे 9 आणि भारतीय जनता पक्षाचे 9 मंत्री असा शपथविधी पार पडला. त्यामुळे शरद पवारांचं दु;ख वेगळं आहे, असं फडणवीस म्हणाले.