धुळे : मराठा आरक्षणसंदर्भात राज्यात विविध ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकडे येणाऱ्या सर्व मार्गावरची एसटी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे.


मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान सर्वाधिक नुकसान एसटीचं झालं आहे. राज्यात काही ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक, एसटी बसेस जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. चार दिवसात राज्यात 63 एसटी बसेसचं नुकसान झालं आहे. या आंदोलनाची तीव्रता मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद विभागात अधिक प्रमाणात असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने औरंगाबादकडे येणाऱ्या मार्गावरीव एसटी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

एसटीचं नुकसान आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत काही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एसटी प्रशासनाला औरंगाबादकडे जाणारी एसटी सेवा रद्द करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनने एसटीच्या चाळीसगावच्या डेपो मॅनेजरांना आजच अशा प्रकारचं पत्र पाठवलं आहे.
आंदोलनादरम्यान तरुणाचा मृत्यू
औरंगाबादेत आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचं गोदावरी नदीत उडी मारली. काही वेळानंतर त्याला नदीबाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबादमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक तरूणांनी गोदावरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी
पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजीचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला. एका महिला कार्यकर्त्यांनं कार्यक्रम सुरु होत असताना मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिल्यानंतर हा प्रकार घडला. उपस्थित पोलिसांनी महिला आंदोलकाला ताब्यात घेतलं, त्याआधी 25 ते 30 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. पिंपरीतील क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्राहलायच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी ठिय्या
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. बीड जिल्ह्यातील परळीत 18 जुलैपासून या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर जागेवरुन हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

'मेगा भरती रद्द करा'
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरुच आहे. जोवर ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही. अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.