रत्नागिरी : सध्या कोकणातील सर्वच व्यवसायिक मोठ्या संकटात आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यानंतर पर्यटन व्यवसाय शिवाय त्यावर आधारित सर्वच व्यवसायांना मोठा फटका बसला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात यावर लोकांचा उदरनिर्वाह चालतो. ही बाब काही नव्यानं सागण्याची गरज नाही. कोरोना आला आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या निर्णयामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला. पण, आता मात्र लॉकडाऊनचा निर्णय परवडणारा नाही. हवे असल्यास कठोर निर्बंध घाला. त्यांचं पालन आम्ही सर्व व्यवसायिक नक्की करू. पण, लॉकडाऊन नको!' ही प्रतिक्रिया आहे मागील जवळपास 25 ते 30 वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये असलेल्या रमेश किर यांची.
अनेकांचे व्यवसाय बंद पडायची वेळ
रमेश किर सध्या रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. सध्या सरकार लॉकडाऊनचा विचार करतंय. त्याबाबत कोकणातील व्यवसायिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? त्याचं याबाबत काय मत आहे? हे सारं जाणून घेण्यासाठी 'एबीपी माझा'नं त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत अधिक बोलताना 'मी जे काही सांगतोय हे माझं एकट्याचं मत नाही. सध्या तुम्ही कुणाशीही बोललात तरी याशिवाय वेगळं मत कुणाचंही नसेल. वर्षभर हॉटेल किंवा कोकताही व्यवसाय बंद असेल तर पुन्हा चालू करताना त्याला मोठे कष्ट पडतात. ज्यावेळी हॉटेल सुरू करायचं होतं, तेव्हा मला जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त काळ हा कुशल कर्मचारी वर्ग शोधण्याकरता गेला. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी जे कामगार गेले ते परत आलेच नाही. सरकारनं लॉकडाऊन केलं. पण, सवलती काय दिल्या? विजेचं बिल आलं ते देखील आम्ही भरलं. त्यावर असलेल्या फिक्स चार्जेसमध्ये देखील आम्हाला सुट मिळाली नाही. शिवाय, या काळात मेन्टेन्सचा विषय आहेच. त्याबाबत कोण विचार करणार? अनेकांचे व्यवसाय बंद पडायची वेळ आली. काही तरूण किंवा नवीन उद्योजकांनी कर्ज घेत सारं काही सुरू केलं. त्यांच्या विचार होणार आहे कि नाही? ते यातून पुन्हा कसे उभे राहणार? रात्री आठनंतर हॉटेल्स, दुकानं बंद करावी लागतात. पण, हॉटेलमध्ये येणारा वर्ग हा साधारण आठनंतरच येतो. त्यानंतर पुढील तीन ते चार तास आमचा धंदा होतो. सध्या सिझन आहे. या दोन महिन्यात कमाई करत आम्ही पुढील चार महिने काढणार. पण, आताच कमाई झाली नाही तर पुढे काय करायच? सरकारनं कठोर निर्बंध लादावेत. आम्ही त्याला हरकरत नाही. कोरोनाला संपवण्यासाठी आम्ही साथ देणार. त्याला आमचा विरोध नाही. पण, नियम आखताना त्या धंद्याची, व्यवसायाची गरज काय आहे? याचा विचार होणं गरजचं आहे. अशा शब्दात रमेश किर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नुकसानीतून सावरण्यासाठी यंदाचा सिझन महत्त्वाचा
कोकणचा विचार करता पर्यटनातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. तसं पाहिलं तर पर्यटन आणि त्यावर आधारित इतर व्यवसायांवर देखील अनेक जण अवलंबून आहेत. पण, लॉकडाऊनची चर्चा आणि मागील महिनाभरात वाढते रूग्ण यामुळे कोकणात येणारा पर्यटक हा तब्बल 80 टक्क्यांनी घटला आहे. शिवाय, सध्याचा सिझन हा महत्त्वाचा आहे. गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी किमान यंदाचा सिझन महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढील काळात किमान तग धरता येईल अशी आशा करता येईल. पण, सध्याची स्थिती पाहता सर्वच व्यवसायिक हतबल झाले आहेत. याबाबत आम्ही हॉटेल व्यवसायासोबत स्पोर्ट अॅक्टिव्हिटीमध्ये असलेल्या सुहास ठाकूर - देसाई यांच्याशी देखील संपर्क साधला.
लॉकडाऊनचा निर्णय घेताना विचार व्हावा
यावेळी बोलताना सुहास ठाकूर - देसाई म्हणाले की, 'कोणताही व्यवयास बंद सहज होतो. पण, चालू करताना काय अवस्था होते. हे आम्हाला ठावूक आहे. कामगारांना पगार हा द्यावा लागतो. सध्या काही खूप मोठ्या प्रमाणत धंदा होतोय असं नाही. पण, किमान आमच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्या होत्या. पण, त्यावर देखील पाणी फेरलं. हॉस्पिटालिटी इंडस्ट्रीचा जीडीपीमध्ये देखील मोठा वाटा आहे. कोकणची अर्थव्यवस्था तर पर्यटनावर आहे. शिवाय, प्रत्येक ठिकाणी काम करणारा वर्ग हा बाहेरच्या राज्यातील देखील मोठा आहे. गेल्यावर्षी त्यांना 50 टक्के पगार किंवा इतर काही सवलती देत आम्ही सांभाळलं देखील. पण, यापुढे सारं कठिण आहे. हॉटेल किंवा कोणताही व्यवसाय बंद असला तरी त्याला खर्च नाही असं होत नाही. शिवाय, काही बेसिक गोष्टी लाईटबिल, विविध टॅक्स हे आम्हाला भरावे लागतात. याचा विचार कोण करणार? त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेताना यांचा विचार व्हावा. अशी प्रतिक्रिया देत हॉटेल व्यवसायिक असलेल्या सुहास ठाकूर - देसाई यांनी देखील संभाव्य लॉकडाऊनला आपला विरोध दर्शवला.
'पुन्हा लॉकडाऊन' हा शब्द ऐकल्यावर आमची झोप उडाली
यावेळी वेळी एबीपी माझानं या ठिकाणच्या काही कर्मचाऱ्यांशी देखील चर्चा केली. स्थानिक शिवाय बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. त्यावेळी त्यांनी 'आम्ही जगणार कसं? आमची कुटुंबं आमच्यावर अवलंबून आहेत.' असे निरूत्तर करणारे सवाल उपस्थित केले. राज्याबाहेरून आलेल्या कामगारांनी तर गेल्यावर्षी ओढावलेली परिस्थिती केवळ आठवली तरी मनावर मोठा आघात होतो. सध्या कुठं आम्ही यातून सावरतोय. त्यामुळं 'पुन्हा लॉकडाऊन' हा शब्द ऐकल्यावर आमची झोप उडाल्याची प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.