Nagpur News नागपूर : शेतकर्यांच्या वीज बिल माफी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिल (Electricity Bill) माफीचा जीआर राज्य सरकारने काढलेला आहे. पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचे बिल भरण्याची गरज नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. आगामी वर्षानंतर राज्यात आमचेच सरकार पुन्हा येणार आहे. तेव्हा आम्ही पुन्हा वीज बिल माफ करू. असा विश्वासह फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवला आहे. आज उपराजधानी नागपूर (Nagpur News) येथे पार पडलेल्या डीपीडीसीच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली आहे.
नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी 5 हजार कोटी रुपयांचा निधी
नागपूरच्या नियोजन आराखड्यात मोठा निधी देऊन अजून मोठी वाढ आपण केली आहे. विविध कामांसाठी नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारने 5 हजार कोटी रुपये दिले आहेत. सोबतच काही चांगल्या सूचनाही या बैठकीतून पुढे आल्या आहेत. सोबतच संरक्षित वन क्षेत्राच्या अवतीभवती असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सोलर फॅन्सीग जिल्हा विकास निधीतून करण्याचा आमच्या प्रयत्न आहे. सोबत पांदन रस्त्यांसाठी खास निधी राखीव ठेवला असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विकासकामे अधिक वेगाने करण्याचा आमचा प्रयत्न
नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे. येणाऱ्या काळात ते अधिक वेगाने करण्याचा आमचा प्रयत्न आहे, आणि आम्हाला याची देखील कल्पना आहे की या विकासकामांमुळे नागरिकांना काहीप्रमाणात त्रास देखील होत आहे. मात्र आपल्या घरी सुद्धा आपण काही काम काढलं तर काही त्रास सहन करावा लागतोच. सुरू असलेले विकासकाम वेगाने करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवले पाहिजे, अशी सूचना आम्ही संबंधित विभागाला दिल्या असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपमधील राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा खुलासा
राज्याच्या राजकारणात भाजपमधील राष्ट्रीय अध्यक्ष पदाला घेऊन अनेक नावांची चर्चा आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव असल्याचे पुढे आले आहे. या विषयी भाष्य करत या संदर्भात अखेरीस फडणवीस यांनीच स्वतः खुलासा केलाय. ही चर्चा फक्त माध्यमानी सुरू केली आहे आणि ही चर्चा फक्त माध्यमामध्येच सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या