भुसावळमध्ये हत्याकांडाचा थरार, भाजप नगरसेवकासह चौघांची निर्घृण हत्या
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 07 Oct 2019 07:14 AM (IST)
अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडली आहे. या हत्याकांडातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हत्याकांडाच्या कारणांचा आणि आरोपींचा शोध पोलीस आहेत.
जळगाव : पूर्व वैमनस्यातून भाजप नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडली आहे. या हत्याकांडातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हत्याकांडाच्या कारणांचा आणि आरोपींचा शोध पोलीस आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील गुन्हेगारीचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. याच मालिकेत आज भुसावळ नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. रवींद्र खरात हे त्यांच्या आंबेडकर नगर परिसरातील घरात बसले असताना मोटार सायकलवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. या चौघांनी चाकू, दगड, विटा यांच्या सहाय्याने खरात कुटुंबावर हल्ला केला. यावेळी खरात परिवारातून प्रतिकार वाढल्याने मोटार सायकलवर आलेल्या एका आरोपीने आपल्यासोबत आणलेल्या बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यातील तिघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर रवींद्र खरात यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने भुसावळसह जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील खरात, मुलगा प्रेमसागर आणि रोहित खरात आणि त्यांचा मित्र सुमित गजरे या चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पोलिसांनी तीन संशयित आरोपीना तातडीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून या घटनेतील कारणांचा आणि आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहेत.