मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारीत 'ठाकरे'च्या प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. फक्त निर्मातेच नव्हे तर प्रेक्षक आणि सेलिब्रिटीज अशा सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला आहे. क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने 'ठाकरे' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एका व्हिडीओद्वारे बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


येत्या 25 जानेवारीला  'ठाकरे' हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. या व्हिडीओत बाळासाहेबांसमवेत घालवलेल्या क्षणांबद्दल सांगताना सचिन म्हणतो की, "शिवाजी पार्क मध्ये आम्ही क्रिकेट प्रॅक्टिस करत असताना ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंची तेथे सभा भरायची तेव्हा तेथील सभेची जोरदार सुरु असलेली तयारी, तेथील लोकांमधील ओसंडून वाहणारा उत्साह आणि बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आसुसलेले श्रोते हे वातावरण पाहण्यासारखं असायचं. मी जेव्हा कधी त्यांना भेटायला जायचो तेव्हा प्रत्येकवेळी मी निघण्यापूर्वी ते न विसरता मला म्हणायचे... "जा, देशाचं नावं उज्वल कर. तुझे सर्वोत्तम दे."

या व्हिडीओत सचिनने त्यांच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या आहेत. मी जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायचो तेव्हा बाळासाहेब सांगायचे देशाला गौरव वाटेल असाच खेळ कर. मी त्यांचे हे शब्द आशीर्वादाप्रमाणेच मानायचो आणि तसा खेळ करायचा प्रयत्न करायचो असेही सचिनने म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये खासदार संजय राऊत, अभिनेता अजिंक्य देव आणि इतर काही शिवसैनिकांच्या प्रतिक्रियाही दाखवण्यात आल्या आहेत.

बाळासाहेबांनी शिवसेनेचे मुखपत्र सामानासाठी लिहीत असताना, तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला "जर तुम्ही सचिनवर इतके प्रेम करता तर तुम्ही त्याला भारतरत्न का देत नाही? असा प्रश्न करुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्याचे आवाहन केले होते.

सचिन तेंडुलकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच विशेष अनुबंध जपले आहेत. हे दोन्ही महाराष्ट्राचे गौरव क्रिकेटचे भावनिक चाहते आहेत. लाखो-करोडो लोकांच्या एका मास्तरकडून त्यांच्या दुसऱ्या मास्तरला देण्यात आलेली ही एक भावपूर्वक श्रद्धांजलीच आहे.

पहा व्हिडीओ