Bharat Jodo Yatra: कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यान एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. ते म्हणजे काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर त्यांचे भाऊ मुलं, भाचे, पुतणे असे भावी राजकीय वारसदार या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
संविधानिक मूल्ये आणि सद्भावनेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा मोठ्या उत्साहात आणि प्रचंड गर्दीत देगलूर मधुन महाराष्ट्रात दाखल झाली. देगलूरला अशोक चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींचे स्वागत केले आणि तेथेच कॉर्नर सभा पार पडली. या ठिकाणी महाराष्ट्र काँग्रेस मधील जवळपास सर्वच नेते त्यांच्या समवेत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच जेव्हा यात्रा वण्णाळी येथील गुरुद्वारा परिसरात पुढे निघाली यावेळी या यात्रेत त्यांच्या समवेत अशोक चव्हाण यांच्या सुजया आणि श्रीजया या दोन्ही कन्या सहभागी झाल्या. त्यांचा हा सहभाग दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाला. इथेच माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत ही सहभागी झाले होते..
तिसऱ्या दिवशी जेव्हा ही यात्रा शंकर नगरहून पुढे मार्गक्रमण करत होती यावेळी माजी मंत्री सतेज पाटील त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे ही राहुल गांधी यांच्या सोबत या पदयात्रेत चालत होते.
चोथ्या दिवशी जेव्हा ही यात्रा नांदेड शहरात पोहोचली इथे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड हे या यात्रेत सहभागी झाले. एवढेच नाहीत तर इथे दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा, जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड याही सहभागी झाल्या. या सर्वांनी अख्ख्या नांदेड शहरातील पूर्ण पदयात्रेत आपला उस्फुर्त सहभाग नोंदवला.तसेच संध्याकाळी नवा मोंढा येथे झालेल्या सभेत अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाणही स्टेजवर दिसल्या.
पाचव्या दिवशी जेव्हा राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा चोरंबा फाटा या ठिकाणाहून हिंगोलीकडे मार्गक्रमण करत होती. त्यावेळी त्यांच्या समवेत पहिल्यांदा युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे,आमदार सचिन अहिर, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे नेते वारंगा फाट्याच्या आधीपर्यंत असलेल्या टी ब्रेक पॉईंट पर्यंत सहभागी झाले. यानंतर पुढे अमित देशमुख आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे, दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी हे ही राहुल गांधी यांच्या समवेत दिसून आले.
एकूणच महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत असलेल्या या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री,आमदार यांच्या समवेत त्यांची मुलं असतील किंवा इतर नातेवाईकही सहभागी झालेले पाहायला मिळतील. प्रत्येकाने आपापल्या भागातील विविधतेचे दर्शनही राहुल गांधी यांच्यासमोर घडवून आणले होते. ज्यामुळे कधी नव्हे ते महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये या यात्रेच्या दरम्यान एक वाक्यता दिसून आली.