Praniti Shinde : खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ही मानवतेची यात्रा होती. ही यात्रा राजकीय किंवा नेत्यांची यात्रा आहे असं कधीच वाटलं नसल्याचे मत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी व्यक्त केलं. प्रणिती शिंदे या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रे संदर्भात आलेले अनुभव सांगितले. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांचे नवे रुप आम्हाला पाहायला मिळाल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
यात्रेदरम्यान एक भावनिक वातावरण
राहुल गांधी हे सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने बोलत होते. हीच त्यांची खरी प्रतिमा असल्याचे शिंदे यावेळी म्हणाल्या. भाजपकडून राहुल गांधी यांची खरी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे म्हणाल्या. या यात्रेदरम्यान एक भावनिक वातावरण होते. कुठेही अडथळा न पोहोचला ही यात्रा यशस्वी पार पडली. याचे सर्व श्रेय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सर्व भारत यात्रींना जाते असेही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. काश्मीरमध्ये यात्रेच्या वेळी जे स्वरुप होतं ते मागील 20 वर्षात आम्ही बघितलं नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. सर्वसामान्य लोक, महिला देखील मोठ्या संख्येनं होत्या.
महाराष्ट्रात यात्रेला चांगला प्रतिसाद
तो माझा मुलगा आहे, तो माझा भाऊ आहे, या भावनेने लोक राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील झाल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. ज्या राज्यात तुम्ही जाल तेव्हा एक दिवस तुम्ही महिलांसाठी द्या अशी कल्पना राहुल गांधी यांना दिली होती. ती त्यांनी मान्य केली. महाराष्ट्रात याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. महाराष्ट्र हे मूळ काँग्रेसचं, पुरोगामी राज्य असल्याचे यात्रेतून दिसून आल्याचे राहुल गांधी म्हणाल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. महिला, शेतकरी कामगार या यात्रेत येतात असे शिंदे म्हणाल्या.
राहुल गांधी कठोर परिश्रम करणारे नेते
भाजपने केलेल्या प्रत्येक टीकेला मला उत्तर द्यावेसं वाटत नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. वेगल्या अँगलने त्यांचे वाचन सुरु असल्याचे शिंदे म्हणाले. राहुल गांधी हे एक कठोर परिश्रम करणारे नेते आहेत. ही यात्रा राजकीय नव्हती. कारण यामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग होता असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
लोकांचे प्रश्न घेऊन ही यात्रा सुरु होती
या यात्रेतून राजकीय फायदा झाला तर चांगलेच आहे. पण ही यात्रा राजकीय दृष्टीकोनातून काढली नव्हती. ही यात्रा तरुणांचे प्रश्न, विकासाचे मुद्दे, बेरोजगारी, शेतकरी या मुद्यावर होती. जनतेचे विषय घेऊन ही यात्रा सुरु होती असे प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. आमचा आवाज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा हाच आमचा उद्देश होता असे शिंदे म्हणाल्या.
यात्रेचा पक्षाला खूप मोठा फायदा झाला
या यात्रेचा पक्षाला खूप मोठा फायदा झाला. संगठन खूप मजबूत झाले आहे. ज्या ज्या जिल्ह्यात ताकद कमी झाले होते, तिथे संगठन वाढण्यास मदत झाल्याचे प्रणिती शिंदे म्हणाले. यापुढेही आम्ही लोकांसोबत असणार आहे. या यात्रेचा फायदा जर निवडणुकीत झाला तर चांगले आहे. पण ही यात्रा राजकीय दृष्टीकोनातून काढली नसल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
सत्ताधाऱ्यांकडून डिवचण्याचा प्रयत्न
सत्ताधाऱ्यांना वाटले नव्हते की ही यात्रा एवढी यशस्वी होईल किंवा एवढा चांगला प्रतिसाद मिळेल. त्यामुळंच ठिकठिकाणी यात्रा अडवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांकडून डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या: