Sugar Production : सध्या देशात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचं उत्पादन झालं आहे. अशातच साखरेच्या उत्पादनातही (Sugar Production) मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने साखर (Sugar) उत्पादनाबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचं उत्पादन 6 लाख टनांनी वाढलं आहे. यंदा साखरेचं उत्पादन 187 लाख टनांवरुन 193 लाख टन झालं आहे. 


देशात साखरेचे उत्पादन 6 लाख टनांनी वाढले 


मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील साखरेचं उत्पादन अधिक वाढले आहे. आतापर्यंत साखर उत्पादनाची स्थिती कायम असल्याचं जाणकारांचे म्हणणं आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरात घसरण नोंदवली जाऊ शकते. याचा देशातील मोठ्या लोकसंख्येला आर्थिक फायदा होईल. इंडियन शुगर मिल असोसिएशनची (इस्मा) आकडेवारी समोर आली आहे. त्यांच्या मते, गेल्या 4 महिन्यांत साखरेचे उत्पादन 3.42 टक्क्यांनी वाढून 193.5 लाख टन झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत साखरेचे उत्पादन 187.1 लाख टन होते. यंदा त्यामध्ये 6 लाख टनांची वाढ झाली आहे.


साखर उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक; उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्येही उत्पादन वाढलं 


देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर-जानेवारीमध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 72.9 लाख टन होते, ते यंदा 73.08 लाख टन झाले आहे. त्याचवेळी, उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी 50.3 लाख टन होते. ते आता 51 लाख टन झाले आहे. तज्ज्ञ ही वाढ कमी मानत असले तरी गेल्या वर्षी याच कालावधीत कर्नाटकात साखरेचे उत्पादन 38.08 लाख टन होते. यंदा 39.4 लाख टन झाले आहे. इतर राज्यांतील साखर उत्पादनाची स्थिती पाहिल्यास सुमारे 4 लाख टनांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 


यंदा देशात 520 कारखान्यांनी ऊसाचं गाळप केलं


गेल्या वर्षीच्या साखर गळीत हंगामात 510 साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप केलं होतं. मात्र, यावर्षी 31 जानेवारीपर्यंत 520 साखर कारखान्यांचे गाळप सुरु आहे. इथेनॉल निर्मितीसाठी पाठवलेला मोलॅसेस एकूण साखर उत्पादनापेक्षा वेगळा असतो. गेल्या वर्षी ते 187.1 लाख टन होते. मात्र, भारत सरकार इथेनॉल निर्मितीवर अधिक भर देत असल्याचा कयास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sugar industry : साखर उद्योगातील अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीसांनी घेतली सहकारमंत्री अमित शाह यांची भेट, केल्या 'या' मागण्या