भंडारा : जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेल्यानंतर कालव्यात उतरुन हातपाय धुणे काका-पुतण्याच्या जीवावर बेतलं. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आसलपानी इथल्या कारली लघुकालव्यात बुडून या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साहिल राजेश कोकोडे (वय 12 वर्ष) आणि हौसीलाल हिरदेराम कोकोडे (वय 24 वर्ष दोघेही रा.आसलपानी ता.तुमसर) अशी मृतांची नावे आहेत. साहिल हा येरली इथल्या आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. तो आश्रमशाळेत जाणार होता, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने आसलपानी गावावर शोककळा पसरली आहे. 


साहिल आणि हौसीलाल जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. घराकडे परत येताना वाढत्या तापमानामुळे घामाने भिजलेले दोघेही हातपाय धुण्यासाठी कारली लघुकालव्यात उतरले. यावेळी तोल जाऊन दोघेही पाण्यात पडले. परंतु तिथे वाचवण्यासाठी कोणीही नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र तरुण मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  


वर्ध्यात शेतातील तलावात बुडून चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू
समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात शेतात खेळत असताना तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना 4 एप्रिल रोजी घडली होती. मृत दोघेही बहिण-भाऊ होते. नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणलं होतं. हे कुटुंब त्यांच्या दोन मुलांसह शेतातील एका घरात राहतात. 3 एप्रिलच्या संध्याकाळी शीतल शैलेश कुमरे (वय 5 वर्षे) आणि शिवम शैलेश कुमरे (वय 3 वर्षे) हे दोघे शेतात असलेल्या तलावावर गेले. खेळत असताना अचानक दोघेही तलावात बुडाले. यावेळी त्याचे आई-वडील शेतात काम करत होते. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न दिसल्याने दोघांनी शोधाशोध सुरु केली. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावात दिसले.