वर्धा : तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे दोघेही तलावाजवळ खेळत होते. समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात ही घटना घडली आहे. मृत चिमुकले हे भाऊ-बहीण आहेत. ही घटना घडली तेव्हा या बालकांचे आई-वडील शेतात काम करत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले होते. हे कुटुंब त्यांच्या दोन मुलांसह शेतातील एका घरात राहतात. रविवारी, 3 एप्रिल रोजी सायंकाळी शीतल शैलेश कुमरे (5) व शिवम शैलेश कुमरे (3) हे दोघे शेतात असलेल्या तलावावर गेले. वर्धेतील समुद्रपूर तालुक्यातील शेडगावजवळील जुनापाणी परिसरात शेतात खेळत असताना अचानक दोघेही तलावात बुडाले असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली.


ही घटना घडली त्यावेळी त्याचे आई-वडील शेतात काम करत होते. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न दिसल्याने दोघांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावात दिसले.  घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना देण्यात आली.  पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. हा अपघात होता की घातपात केला असावा, याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha