मंडप सजला, नवरी नटली, पण अक्षता पडण्यापूर्वी नवरदेव पसार
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2016 09:35 AM (IST)
भंडारा : मंडप सजला होता, नवरी नटली होती, थोड्याच वेळात अक्षता पडणार होत्या, पण त्याआधीच नवरदेव पसार झाला. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील खराबी गावात ही घटना घडली. लग्नापूर्वीच नवरदेव पळून गेल्याने संबंधित तरुणीचं स्वप्न भंगलं. अमर तितीरमारे असं पसार झालेल्या नवरदेवाचं नाव असून तो एसटी महामंडळात क्लर्क पदावर काम करतो. गावातील समाज मंदिरात लग्नाची सर्व तयारी झाली होती. रंगीबेरंगी फुलांनी मांडव सजवण्यात आला. पण लग्न लागण्यापूर्वीच होणारा नवरा पळून गेल्याने तरुणीने रंगवलेली स्वप्नं बेरंगी झाली. फसवणुकीप्रकरणी वधूच्या पित्याने अमर तितीरमारे आणि त्याच्या कुटुंबाविरोधात मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घरातून दोन दिवसांपासूनच नवरदेव फरार लग्नाची सर्व तयारी झाली होती. अगदी लग्न लागण्याची वेळही सरुन चालली होती. तरीही वऱ्हाड आणि नवरदेव न आल्याने वधूच्या पित्याने फोन करुन चौकशी केली. चौकशी केली असता मुलगा गेले दोन दिवसांपूर्वीच पसार झाला आहे, अशी धक्कादायक माहिती त्यांन मिळाली. पैशांच्या हव्यासापोटी पसार ? मुलाला पहिल्यापासूनच पैशांचा हव्यास होता. त्याने अनेकदा महागड्या वस्तूंची मागणीही केली होती. एवढंच नव्हे तर त्याने दोन लाख रुपयेही मागितले होते. पण या मागण्या पूर्ण करण्याची परिस्थिती माझ्या वडिलांची नाही, असं मी त्याला स्पष्ट झालं होतं. त्यामुळेच ऐनवेळी तो पळून गेले, असं मुलीने सांगितलं. दरम्यान, पोलिस या प्रकरणा अधिक तपास करत आहेत.