Loksabha Election 2024 : भंडारा-गोंदिया लोकसभा (Bhandara Gondia Loksabha) मतदारासंघाची मतमोजणी भंडारा शहराजवळील पलाडी येथील स्ट्रांग रूम परिसरात होणार आहे. त्यामुळं या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कलम 144 घोषित केली आहे. मतमोजणी केंद्राचे ठिकाणी 200 मीटर परिसरातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेमध्ये कुठलीही कृती करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. परिणामी, या परीसरात हॉटेल, टेलिफोन बूथ, झेरॉक्स मशीन, फेरीवाले यांना व्यवसाय करता येणार नाहीये.
सोबतच मतमोजणी केंद्राच्या परीसरात मंडप उभारणे तसेच उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी असो वा कार्यकर्ता यांना बसण्यासाठी टेबल, खुर्च्या लावण्यास मनाई आहे. या नियमांचे आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम 188 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बजावलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
स्ट्रांग रूम परिसरात कलम 144 लागू
लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीला पूर्व विदर्भापासून (Vidarbha) सुरुवात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर विदर्भात जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून पक्षातील दिग्गजांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांना साद घातली आहे. आता येत्या 4 जूनला मतदारांचा अंतिम कौल कुणाच्या दिशेने असेल हे स्पष्ट होणार आहे. सध्या घडीला सर्व मतदारांचे मत ज्या ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले त्या सर्व मशीन स्ट्रांग रूममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारासंघाचा कौल कुणाला ?
यंदा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारासंघात चुरशीची लढत असल्याचे बघायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे या मतदारसंघात तब्बल 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा या चिन्हावर उमेदवार उभे होते. तर काँग्रेसने या मतदारसंघात फेस चेंजची खेळी खेळली असून काँग्रेसच्या (Congress) डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole)यांना मैदानात उतरवले आहे. तर भाजपने आपला जूनाच चेहरा कायम ठेवत सध्याचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यावर विश्वास दाखवीत त्यांची उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे मतदारराजाने आता नेमका कोणच्या पारड्यात आपले मत दिले आहे, हे आता 4 जुनलाच कळणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनही सज्ज झाले आहे.
व्हीव्हीपॅट काय आहे?
व्हीव्हीपॅट एक स्वतंत्र मत पडताळणी यंत्र आहे. व्हीव्हीपॅट मशील ईव्हीएमला जोडल्यानंतर मतदाराला मतदानाची पावती मिळते. यामुळे आपले मत आपण योग्य उमेदवाराला दिलं आहे का, हे तपासता येतं. सध्या निवडणूक आयोगाकडून सर्व ईव्हीएमला व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात येत नाही. कोणत्याही पाच ईव्हीएमला रँडम पद्धतीने व्हीव्हीपॅट मशीन जोडून पडताळणी केली जाते. पण, याचिकाकर्त्यांनी सर्व ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडून मतांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या