भंडारा : भंडाऱ्यातील लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाच्या हत्याप्रकरणाचा उलगडा झाला आहे. या नवरदेवाची हत्या त्याच्याच भावी पत्नीने केलल्याचं उघड झालं आहे. प्रेम प्रकरणात अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने तिने विनोद कुंभरेची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जंगलात फेकला. तुमसर पोलिसांनी या प्रकरणी 23 वर्षीय रीना मडावी आणि 26 वर्षीय प्रफुल्ल परतेती यांना अटक केली आहे.


तुमसर तालुक्यातील येरली गावात राहाणाऱ्या 26 वर्षीय विनोद कुंभरे याचे गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील कोयलारी गावातील 23 वर्षीय रीना मडावी या तरुणीशी लग्न जुळलं होतं. मात्र रीनाचे तिच्याच गावात राहाणाऱ्या 26 वर्षीय प्रफुल्लशी प्रेमसंबंध होते. तरीही कुटुंबीयांनी रीनाचं लग्न विनोद कुंभरे या तरुणाशी ठरवलं. मात्र रीनाला हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे तिने लग्नाच्या आदल्या दिवशी विनोदला गावाशेजारच्या एका रस्त्यावर बोलवलं. यानंतर प्रियकराच्या मदतीने त्याच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली.

लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाची हत्या, चाकू भोसकून मृतदेह जंगलात फेकला
यानंतर पोलिसांनी कोयलारी गाव गाठत चौकशी केली असता, गावातील प्रफुल्ल परतेती या मुलाशी रीनाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली. आपल्या प्रेमप्रकरणात विनोद अडथळा होणार असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली प्रफुल्ल आणि रीनाने पोलिसांना दिली. या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी आहेत का, याचा शोध तुमसर पोलिस घेत आहेत.

येरली गावातील विनोद कुंभरे हा चंद्रपूर जिल्ह्यात एका खाजगी कंपनीत कामावर आहे. 6 मे रोजी त्याचं आणि त्याच्या धाकट्या भावाचं लग्न होतं. विनोद 5 मे रोजी संध्याकाळी काही कामानिमित्त घराबाहेर गेला तो परतलाच नाही. त्यानंतर 6 तारखेला सकाळी गावशेजारील जंगलात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या पोटावर चाकूने वार केल्याची खूण होती आणि शरीराजवळ एक चाकू ठेवला होता. त्यामुळे चाकू भोसकून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.