Bhaje Village : इर्शाळवाडीची दुर्घटना घडल्यानंतर पुण्यातील भाजे गावातील ग्रामस्थांचे डोळेही पाणावले आहेत. म्हणूनच इर्शाळवाडीच्या बातम्या पाहणं आणि वाचनं  त्यांनी बंद केलं. 23 जुलै 1989 सालची घटना या सर्वांच्या नजरेसमोर येऊन उभी ठाकली आहे. त्या दिवशी हे गावही दरडी खाली गाडलं गेलं होतं. त्यात 39 जणांचे जीव गेले होते आणि शेकडो जनावरं ही दगावली होती. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर या सगळ्या कटू आठवणी जाग्या झाल्या आणि अनेकांना अश्रू अनावर झाले. 

Continues below advertisement


पुणे जिल्ह्यातील भाजे हे गाव भाजे लेणी म्हणून देशभर ओळखलं जातं. इथं देशातील असंख्य इतिहास अभ्यासक अभ्यासासाठी येतात तर पर्यटक हा इतिहास अनुभवण्यासाठी इथं पोहचतात. मात्र या लेणींपर्यंत पोहचण्यासाठी त्यांना भाजे गावातूनच जावं लागतं. पण हे भाजे गाव पुनर्वसित आहे, याची फारशी कल्पना त्यापैकी अनेकांना नाही आहे. इर्शाळवाडी प्रमाणेच भाजे गावात 1989 साली दुर्घटना घडली होती. 


त्यावेळी याच गावातील रजनी खाटपे आणि मंगल खाटपे यांच्या कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातमंगल खाटपे यांची मुलगी, सासू, सासरे, आज्जी सासू, नणंद, नंदावा, नंदेचा मुलगा, नंदेचे दिर असे आठ दगावले होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील रजनी खाटपे आणि मंगल खाटपे हे दोघेच बचावले होते. अशा दुर्घटना झाल्या की त्यांच्याडोळ्यासमोर तोच दिवस पुन्हा उभा राहतो आणि अख्ख कुटुंब गमावल्याच्या आठवणी जाग्या होतात. 


सुरक्षितस्थळी आताच पुनर्वसन करायला हवं!


भाजे, माळीण, तळीये आणि इर्शाळवाडी सारखी वेळ आपल्यावर येऊन द्यायची नसेल तर डोंगराच्या पायथ्याला राहणाऱ्या गावांनी वेळीच पुनर्वसन करून घ्यायला हवं. दुसरीकडे सरकारने अशा दुर्घटना घडण्याची आणि त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यातच धन्यता मानू नये. त्यांनी ही अशा धोकादायक गावांचं सुरक्षितस्थळी आत्ताच पुनर्वसन करायला हवं. तेंव्हाच भविष्यात अशा वेदनादायी घटना थांबतील आणि अनेकांचा जीवही वाचेल.


पसारवाडीच्या लोकांचा जीव टांगणीला!


त्यांच्याप्रमाणेच पुण्यातील माळीणला खेटून असणारी पसारवाडीने 20 जुलैची रात्र अक्षरशः जागून काढली होती. इर्शाळवाडीच्या दुर्घनेनंतर हे अख्ख गाव भीतीच्या सावटाखाली आलं होतं. माळीणच्या दुर्घनेनंतरच्या अहवालात पसारवाडी धोकादायक असल्याचं शासनाने जाहीर केलं होतं. आपल्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून इथल्या ग्रामस्थांनी पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली. ग्रामस्थांनी स्वतःची अडीच एकर जागा पुनर्वसनासाठी देऊ ही केली. मात्र गेली नऊ वर्ष इथलं पुनर्वसन रखंडलंय, परिणामी दोनशे लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे.


हेही वाचा-


Pune News : घर देण्याच्या नावाखाली राज्यातील सात हजार पोलिसांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक