मुंबई: भैय्यू महाराजांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या दोषींना शिक्षा मिळाली, न्याय मिळाल्याचं समाधान आहे पण दोषींची शिक्षा वाढवण्यासाठी वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती भैय्यू महाराजांच्या पत्नी आयुषी शर्मा यांनी सांगितलं. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.
राजकीय वर्तुळात दबदबा असलेल्या अध्यात्म गुरू भैय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या आत्महत्येमागे त्यांचा सेवक विनायक दुधाळे, चालक शरद देशमुख आणि केअरटेकर पलक पुराणिक असल्याचं समोर आलं होतं. आता न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली आहे.
भैय्यू महाराजांना पलक पुराणिक ही तरुणी ब्लॅकमेल करत असल्याचं आयुषी शर्मा यांनी सांगितलं. त्या संबंधी भैय्यू महाराजांनी आपल्याशी चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं. भैय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर आपल्याला यांनाही जीवे मारण्याची धमक्या दिल्या होत्या असंही त्यांनी सांगितलं.
आयुषी शर्मा म्हणाल्या की, "पलक पुराणिक ही आपल्याशी उद्धट वागत होती. भैय्यू महाराजांना पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. भैय्यू महाराजांनी आपल्याशी यावर अनेकदा चर्चा केली पण नेमकं कारण सांगितलं नाही. पलक आणि तिच्या वडिलांनी भैय्यू महाराजांकडून पैसे उकळले. पलकला महिन्याला दीड लाख रुपये देण्यात यायचे."
भैय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने सावत्र आईवर म्हणजे आयुषी शर्मा यांच्यावर आरोप केले होते. त्यांची दुसरी पत्नी आयुषी आणि कुहू यांच्यात सर्व काही अलबेल नव्हतं. सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली, असा आरोप कुहूने केला होता. तर कुहूला मी आवडत नसल्याने ती असे आरोप करत आहे, असं आयुषी यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, भैय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्येप्रकरणी मध्य प्रदेशातील इंदूर न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयाने विनायक दुधाळे, चालक शरद देशमुख आणि केअरटेकर पलक पुराणिक यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी दोषी तिघांना न्यायालयाने प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा दिली आहे. न्यायालयाने आदेश देताना म्हटले की, भैय्यू महाराज यांचा आत्महत्येला त्यांचे सेवक जबाबदार आहेत. 12 जून 2018 रोजी भैय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली.
साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे. आरोपींनी पैशासाठी भैय्यू महाराजांचा छळ केला हे न्यायालयाने मान्य केले. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा सेवेकऱ्यांवर अधिक विश्वास होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे आश्रम आणि इतर महत्त्वाची कामं या सेवकांकडे सोपवले होते. त्याच सेवेकऱ्यांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या :