BJP leader Pravin Darekar : भाजपचे विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रवीण दरेकर सध्या बोगस मंजूर प्रकरणी अडचणीत आले आहेत. यावरुन भाई जगताप यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 'एकाचवेळी मजूर, आमदार, व्यावसायिक दाखवणारे प्रवीण दरेकर श्री 420 आहेत. त्यांची जागा तुरुंगात आहे. प्रति मजूर संस्थेत प्रवीण दरेकर हे 'मजूर रंगारी' असल्याचे दाखवले आहे. यांनी रंगारी म्हणून मागील अनेक वर्षात भाजपला चुना लावण्याचे काम केले. नरेंद्र मोदी, अमित शाहा व फडणवीस यांना 'चुना' लावला आहे, असा हल्लाबोल भाई जगताप यांनी केला आहे.


प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी दुस-यांदा बोगस मंजूर प्रकरणी चौकशीला बोलावले आहे. खरतर बोगस श्रीमंत मजूर व मुंबई बँकेतील हजारो कोटींचे आर्थिक घोटाळे यांचा विचार करून या दरोडेखोराची पोलीस कोठडी देऊन सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. प्रवीण दरेकर हेच केवळ बोगस मजूर नाहीत तर त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील अनेकजण बोगस मजूर आहेत. ही दरेकर गँग ज्या मजूर संस्थांचे सदस्य आहेत, त्या मजूर संस्थांचीही सहकार विभागाने सखोल चौकशी करून अहवाल सादर करावे अशी आमची मागणी आहे, असा हल्लाबोल भाई जगताप यांनी केला.  


यापूर्वी पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना चौकशीसाठी बोलावून बोगस मजूर कसा बनलास यासह अनेक प्रश्न विचारले. मात्र त्यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून बाहेर येताच पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दबाव आणल्याचा तसेच तीनचार वेळा वरून फोन आल्याचा आरोप केला. त्यामुळे हायकोर्टात त्यांचा जामीन फेटाळला जाऊन अटक करून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) देण्याची मागणी आपण गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडे करणार आहोत, असे भाई जगताप म्हणाले. 


प्रतिज्ञा मजूर संस्थेत प्रवीण दरेकर यांच्यासह एकूण 27 मजूर सदस्य आहेत. मात्र सहकार विभागात या 27 मजूरांनी मजूरी केल्याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. मात्र मागील दहा व मजूर संस्थेला कोट्यवधी रुपयांची कामे मिळाल्याचे अहवालात नमूद केले आहे. मग ही कामे ती कोणत्या मजुरांनी ? मजुरी नेमकी मिळाली कोणाला ? या मजूर संस्थेचे बँक स्टेटमेंट तपासले वेळी संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी वेळोवेळी रोखीने पैसे काढल्याचे दिसून येते.  10 वर्षात किती मजूर सभासदांना किती मजूरी मिळाली याचा कोणताही तपशील संस्थेच्या दरात दिसत नाही, त्यामुळे कोणत्या मजूराला किती मजूरी मिळाली तेही स्पष्ट होत नाही, असे भाई जगताप म्हणाले.