बेळगाव : कोरोनाबाधित रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करुन रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलवर दगडफेक केल्याची घटना बेळगावात घडली. ही घटना पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संतप्त नातेवाईकांना शांत करुन तक्रार देण्यास सांगितले.


मंडोळी रोडवरील मून हॉस्पिटलमध्ये रविवारी (6 सप्टेंबर) यल्लप्पा जाधव यांना कोरोनामुळे श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. पण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सुविधा न दिल्यामुळे त्यांचा सोमवारी (7 सप्टेंबर) मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी दगडफेक करुन हॉस्पिटलच्या काचा फोडल्या.


57 वर्षीय यल्लपा जाधव यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना मून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर यल्लपा जाधव यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. ऑक्सिजनअभावी आणि व्हेंटिलेटरअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन त्यांनी दगडफेक केली.


दरम्यान कोरोनाच्या काळात पैसे घेऊनही उपचार केले जात नाहीत. खासगी हॉस्पिटलमधून पैसे उकळून रुग्णाच्या जीवाशी खेळले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रुग्णालयातील अन्य एका रुग्णाने आपल्याकडून पैसे भरुन घेतले पण बराच वेळ आपल्यावर उपचार केले नसल्याचा आरोप केला आहे.