बेळगाव : उपजाऊ शेतजमिनीचं संपादन केलं तर काय करायचं ही काळजी कणबर्गी परिसरातील शेतकऱ्यांना पडली आहे. त्यामुळे भू संपादनाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या घराच्या दर्शनी भागातच चक्क फास तयार करुन लटकावले आहेत.


रामा डसका, इराप्पा अष्टेकर, पुंडलिक अष्टेकर अशी घरासमोर फास लटकवलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. बेळगावला लागूनच असलेल्या कणबर्गी गावच्या जमिनीचे भू संपादन करण्यासाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

यापूर्वीही चार हजारांहून अधिक एकर जमीन मातीमोल भावाने शेतकऱ्यांकडून विविध कारणासाठी सरकारने संपादित केली आहे. सध्या असलेल्या शेतीवरच यांचा उदरनिर्वाह चालतो. ही जमीन गेली तर काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कोणत्याही परिस्थितीत भू संपादन करु देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

घरासमोर फास लटकवलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अलीकडेच बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे काँग्रेसचे आमदार फिरोज सेठ यांनी स्वीकारल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया गतीमान झाली आहे. सध्या भू संपादनाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. भू संपादनाला विरोध करण्यासाठी कणबर्गी इथे आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.