पालघर: जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका केमिकल कंपनीत गुरुवारी रात्री भीषण स्फोट झाला. स्फोट  इतका भयंकर होता की आजूबाजूचा 15 किलोमीटर पर्यंतचा परिसर भूकंप झाल्यासारखा हादरला. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर  13 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आरती इंडस्ट्रीज साईटमध्ये तीन मृतदेह सापडले.

काल रात्रीपासून या परिसरात अग्नितांडव सुरु आहे. काल रात्री 11.30 च्या सुमारास इथल्या नोवाफेना या कंपनीत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता, की यामुळं तब्बल 15 किलोमीटरच्या परिसर हादरला. रात्री लागलेली आग आता काहीशी आटोक्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळतेय.



या आगीनं रात्री भीषण रुप धारण केलं आणि 6 कंपन्यांना आपल्या भक्षस्थानी घेतलं. या आगीमुळं नोवाफेना या कंपनीसह आरती ड्रग्ज, भारत रसायन, प्राची, युनिबैक्स, दरबारे केमिकल या कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. अजूनही अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, स्फोटातील जखमींना सध्या जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. तर ज्या नोवाफेना या कंपनीत स्फोट झाला, तिथं त्यावेळी किती कामगार होते, त्यांचं काय झालं हे अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र यामध्ये मोठी जीवितहानी झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.