बेळगाव : बेळगावमध्ये एका तरुणीने पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षकासमोरच विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केलेल्या तरुणीला त्वरीत जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात नेण्यात आलं.


कॅम्प पोलिस स्थानकात आज सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

श्रुती असं या तरुणीचं नाव असून तिचं एप्रिल महिन्यात लग्न होणार होतं. पण सासरच्या लोकांनी पाच लाखांची मागणी केली होती. त्यातच भर म्हणून तिच्या होणाऱ्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता.

श्रुती आणि तिच्या पालकांनी पोलिस उपायुक्तांची भेट घेऊन घडला प्रकार सांगितला होता.

पाच लाख रुपये देण्याइतपत श्रुतीच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. शिवाय चारित्र्यावर संशय घेतल्याने निराश झालेल्या श्रुतीने चक्क पोलिस स्थानकात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.