बीड : बीडमधील जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. त्यांच्यासोबत कारकून फडही एसीबीच्या जाळ्यात अडकला. शेळकेंनी कालच बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांना निलंबित करण्याची घोषणा विधानपरिषदेत करण्यात आली.
शेळके एक लाख 15 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे 2008 मध्येही शेळकेंची लाचलुचपत खात्याकडून खुली चौकशी झाली होती. शेळके यांनी आमदार पंडित यांच्याविरोधात खंडणीखोरी आणि अॅट्रोसिटी, तर त्यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांनी धमकावल्याची तक्रार दाखल केली होती.
औरंगाबाद शहरातील सर्वात आलिशान परिसर म्हणून ओळख असलेल्या एन 1 भागात नरहरी शेळके यांचा बंगला आहे. त्याची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे. त्यांच्या घरात 1.2 किलो चांदी, 22 ग्रॅम सोनं, एक बँक लॉकर आणि 16 लाखांचे एफडी मिळाल्या आहेत.
शेळकेंची आमदाराविरोधात तक्रार
‘बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित हे महसूल मंत्र्यांकडे तुमच्याविरुद्ध तक्रार करणार आहेत. तेव्हा त्यांची भेट घेऊन तोडपाणी करा’असा निरोप सुभाष पाटील नावाच्या व्यक्तीने आपल्याकडे पोहचवला होता, असं शेळके यांनी तक्रारीत म्हटलं होतं.
बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डॉ. शेळके यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी करावी, अशी मागणी शेळके यांनी केली होती.
अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन तक्रार केल्याचा राग मनात धरुन आमदार अमरसिंह पंडित व त्यांच्या पीएविरुद्ध शेळकेंनी खोटी तक्रार दिल्याचा आरोप आहे.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना सभागृहात सदस्यांनी जनतेचे प्रश्न मांडायचे नाहीत काय? अधिकाऱ्यांना एवढी मस्ती कशी आली आहे? असे सवाल उपस्थित करताना आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरुद्ध खोटी तक्रार करणाऱ्या शेळके यांना निलंबित करण्याची मागणी केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत आजच्या आज या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली.