नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे एका नव्या आंदोलनासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर अण्णांचं उद्यापासून (शुक्रवार) सत्याग्रह आंदोलन सुरु होणार आहे. 23 मार्च या शहीद दिनाचं औचित्य साधून अण्णा उद्या आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असेल.


जनलोकपाल, निवडणूक सुधारणा या अण्णांच्या इतर जुन्या मागण्यांचाही यात समावेश असणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून अण्णा पहिल्यांदा राजघाटाकडे कूच करतील. त्यानंतर शहीद पार्कला शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात होईल.

रामलीला मैदानावर शेवटच्या क्षणी अण्णांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली. मागच्या आंदोलनांच्या अनुभवातून धडा घेत अण्णांनी यावेळी आंदोलनाचं राजकीयकरण होऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेतल्याचं दिसतं आहे. ‘यावेळी कुठल्याही राजकीय व्यक्तीला स्टेजवर चढू देणार नाही, ज्यांना पाठिंबा द्यायचाय ते प्रेक्षकांमधूनच देतील.’ असं अण्णांनी म्हटलं आहे. शिवाय आंदोलनातून पुढे राजकारणात जायचं नाही असं वचन कोअर कमिटीतल्या लोकांकडून घेण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातून रवाना होण्याआधी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोनवेळा अण्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णा आंदोलनावर ठाम राहिले. आता केंद्रात अण्णांच्या आंदोलनावेळी कोण मध्यस्थी करणार याची उत्सुकता असणार आहे.