बीडचे लाचखोर अप्पर जिल्हाधिकारी कांबळे यांच्याकडे सापडलं घबाड
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2019 11:52 AM (IST)
बी.एम. कांबळे यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं चौकशीमध्ये समोर आलं आहे. त्यांच्या बँक खात्यात वीस लाख रुपये नगद, साठ लाख रुपयांच्या ठेवीसह तीन बंगले, दोन प्लॉट, चाळीस तोळे सोने आणि इतर मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहे.
बीड : लाच घेताना अडकलेले बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं चौकशीमध्ये समोर आलं आहे. त्यांच्या बँक खात्यात वीस लाख रुपये नगद, साठ लाख रुपयांच्या ठेवीसह तीन बंगले, दोन प्लॉट, चाळीस तोळे सोने आणि इतर मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहे. कांबळे आणि त्यांच्या कार्यालयातील एका कारकूनाला 10 दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच लाखांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्यांच्याकडे मोठा घबाड असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या नावे नांदेडमध्ये एक तर औरंगाबादमध्ये दोन बंगले आहेत. औरंगाबाद शहरातील न्यू श्रेयनगरमधील बंगल्याची किंमत एक कोटीपेक्षा जास्त असल्याचं कळतंय. शिवाय पुण्यातील हडपसरमध्ये दोन बीएचकेचा एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत पन्नास लाखांहून अधिक आहे. औरंगाबादच्या सुंदरवाडी परिसरात कांबळेंचे दोन भूखंडही आहेत. या भूखंडांची किंमत कित्येक कोटींची असल्याची माहिती आहे. बी.एम. कांबळेंनी सर्वात जास्त सेवा बीड जिल्ह्यात केली आहे. त्यासोबतच त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे. कांबळेंनी बीड आणि पैठण परिसरात शेती खरेदी केली असण्याची शक्यता असल्याने रजिस्ट्री कार्यालयात चौकशी करुन शेत जमिनाचा शोध सुरु आहे. पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी कांबळेंनी लाच मागितली होती. एका गोदाम रक्षकावर झालेल्या आरोपांची चौकशी कांबळे यांच्याकडे होती. या चौकशीत मूळ अभिलेख तपासला जाणार होता. त्या गोदाम रक्षकाला क्लिनचीट देण्यासाठी कांबळेंनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. संबंधित बातम्या बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला 5 लाखांची लाच घेताना अटक