मुंबई : आज व्हॅलेंटाईन डे ! प्रेमीयुगलांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस. दोघांमधलं प्रेम ताजं असो किंवा जुनं... कितीही भांडणं असो किंवा मतभेद...पण आजच्या दिवशी एकमेकांची एकदातरी आठवण आल्याशिवाय हा दिवस पूर्णच होऊ शकत नाही.
अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. पंचवीस वर्षे एकमेकांच्या सहवासात असलेल्या सेना-भाजपचं आज तरी जुळता जुळता जुळतंय का याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे.
2014 च्या निवडणुकीनंतर यांच्यातील लॉयल रिलेशनशिपला जणू ग्रहणच लागलं. लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर या जोडीत इगो क्लॅशेस वाढले आणि पहिल्यांदा ब्रेक-अपची घोषणा झाली. या संधीचा फायदा घेत अवखळ राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला डोळा मारला आणि मैत्रीचं प्रपोजल पुढे केलं. भाजपने वेळ निभावून नेण्यासाठी राष्ट्रवादीच्या खांद्याचा आधार घेण्याचं जवळजवळ पक्कं केलं होतं. मात्र रुसलेल्या सेनेने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि विधानसभेत जनमताचा आदर करत असल्याचं कारण देत सत्तेपुरतं का होईना आपल्या एक्स भाजपशी पॅच-अप केलं.
गेल्या पाच वर्षांत या अफेयरने बरेचसे अप्स अँड डाऊन पाहिले. कधी उद्घाटन सोहळ्यात हातात हात घालून प्रेमाचा दिखावा केला, तर कधी श्रेयवादावरुन एकमेकांची लक्तरं काढली. अनेकदा एकमेकांवरचा अविश्वास, स्पर्धा, लोभ आणि मत्सर यामुळे घरची भांडणं चव्हाट्यावर आली. पण सत्तेच्या मोहाने (वासनेने) दोघांना लिव्ह-इन मध्ये राहायला भाग पाडलं.
आता पाच वर्षांच्या कॉम्प्लेक्स रिलेशनशिपनंतर पुन्हा व्हॅलेंटाईन डे उजाडला आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत. सेना-भाजपच्या रिलेशनशिप स्टेटसवर राज्याच्या राजकारणाची केमिस्ट्री ठरणार आहे. कारण विरोधकांमधली वाढती जवळीक पाहता भाजपला यंदाचं कर्तव्य महागात पडेल असं चित्र दिसतंय. यामुळे पुन्हा एकदा रुसलेल्या सेनेला पटवण्याचा सिलसिला भाजपकडून सुरु झाला आहे.
व्हॅलेंटाईन वीकपासून नवनवीन प्रस्तावाचे गिफ्ट कार्ड्स आणि लव्ह लेटर्सची देवाणघेवाण सुरु झाली आहे. डिनर डिप्लोमसी डेटची प्लॅनिंग सुरु झाली आहे. आगामी निवडणुकीत 'विल यू बी माय व्हॅलेंटाईन?' म्हणत भाजप सेनेचा प्रत्येक हट्ट पुरवायला तयार झालं आहे. सगळे गिले-शिकवे दूर करुन कमिटेड रिलेशनशिपचे वायदे केले जाऊ लागले आहेत. मात्र हार्टब्रोकन सेनेचं मन जिंकण्यात अजूनतरी भाजपला यश येताना दिसत नाही.
अर्थात चारित्र्य जपणाऱ्या सेनेला कमिटमेंट देण्याआधी कठोर अटी-शर्ती घालाव्याच लागतील. यासाठी भाजपच्या ज्येष्ठ- वरिष्ठांनाही सेनेची मनधरणी करण्याची वेळ येऊ शकते. मात्र एवढं झाल्यानंतर तरी युतीचं पॅच-अप होऊन सेना-भाजपचा व्हॅलेंटाईन डे साजरा होईल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. शेवटी ते म्हणतात ना "एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर.....अँड पोलिटिक्स इज दी गेम ऑफ ऑल पॉसिबलिटीज !!!"
व्हॅलेंटाईन डे स्पेशल : सेना-भाजप युतीची अधुरी प्रेम कहाणी !!!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2019 08:14 AM (IST)
2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमधील लॉयल रिलेशनशिपला जणू ग्रहणच लागलं. लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर या जोडीत इगो क्लॅशेस वाढले आणि पहिल्यांदा ब्रेकअपची घोषणा झाली.
(फाईल फोटो)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -