मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला आहे. मित्रपक्षांना आठ जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे, मात्र महाआघाडी न झाल्यास काँग्रेस 26 तर राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागा लढण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांना आठ जागा सोडण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा सोडतील. महाआघाडी झाल्यास काँग्रेस लोकसभेच्या 48 जागांपैकी 22, तर राष्ट्रवादी 18 जागा लढवण्याची चिन्हं आहेत.
महाआघाडीत प्रकाश आंबेडकर आल्यास भारिप बहुजन महासंघाला चार जागा मिळण्याचे संकेत आहेत. तर स्वाभिमानी, माकप, हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी, आणि रिपाइं कवाडे किंवा गवई गटाला प्रत्येकी एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे.
सध्याच्या जागावाटपानुसार मनसेला महाआघाडीमध्ये स्थान दिसत नाही. मात्र राज ठाकरेंशी हातमिळवणी झाल्यास मनसेच्या वाट्याला लोकसभेच्या किती आणि कोणत्या जागा येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे, दोन जागांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेला तिढा अद्याप कायम आहे. औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागांबाबत निर्णय झालेला नाही. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटलांना नगरच्या जागेवरुन लढण्याची इच्छा असून त्यांनी प्रचार सुरु केला आहे.
महाआघाडीचा फॉर्म्युला ठरला, मित्रपक्षांना आठ, काँग्रेस-राष्ट्रवादीला किती?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2019 11:20 AM (IST)
मित्रपक्षांना आठ जागा सोडण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाआघाडी झाल्यास काँग्रेस लोकसभेच्या 48 जागांपैकी 22, तर राष्ट्रवादी 18 जागा लढवण्याची चिन्हं आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -