बीड : मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी संजय ताकतोडे या तरुणाने बीडच्या बिंदुसरा तालावात जलसमाधी घेतली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील साळेगाव येथील 34 वर्षीय संजय ताकतोडे हे दूध संकलनाचा व्यवसाय करायचे. मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी आज जलसमाधी घेतली. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईला मंत्रालयावर काढण्यात आलेल्या मोर्चेतही ते सहभागी झाले होते.



मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, अशी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे. या मागणीची पूर्तता मुख्यमंत्री करत नाहीत म्हणून संजय यांनी जलसमाधी घेतली. संजय ताकतोडे यांचे प्रेत बीड जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. जय लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आल्यानंतरच पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेऊ, असे कुटुंबियांनी सांगितले आहे.