बीड : बीडमधील ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. या निकालात वंदना सुंदर साखरे या सौंदना ग्रामपंचायतीवर सदस्यपदी निवडून आल्या.  मात्र या विजयाचा आनंद त्यांच्यासाठी क्षणभंगुर ठरला. विजय साजरा होत असतानाच त्यांच्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आणि साखरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नियतीने खेळलेल्या या विचित्र खेळामुळे केवळ साखरे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण सौंदना गाव सुन्न झालं आहे.


स्कूटीवरुन घरी परत येताना दोन सख्ख्या बहिणींचा ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. केज तालुक्यातील बनसारोळाहून सौंदना गावी जाताना हा अपघात घडला. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत स्वतःची आई विजयी झाल्याचा आनंदही या दोघी साजऱ्या करु शकल्या नाहीत. कुटुंबाचा विजयाचा आनंद क्षणातच आक्रोशात बदलून गेला.

18 वर्षांची सोनाली सुंदर साखरे आणि 20 वर्षांची दीपाली सुंदर साखरे या दोघी बहिणी सोमवारी दुपारी घरी येत होत्या. बनसारोळा ते सौंदना रस्ता अतिशय अरुंद आहे आणि या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. याच अरुंद रस्त्यावरुन समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

दीपाली पुण्यात नर्सिंगचं काम करत होती तर सोनाली बनसारोळा येथील महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती. घरातील दोन्ही मुलींचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.