वर्धा : संपूर्ण महाराष्ट्र जिच्यासाठी प्रार्थना करत होता. त्या हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू झालाय. गेल्या सात दिवसांपासून तिची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. आरोपीलाही पीडितेप्रमाणेच यातना व्हायला हव्या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिलीय. तर, पीडितेच्या मृत्यूची बातमी कळताच तिचं मूळ गाव असलेल्या दरोडामधील ग्रामस्थ संतप्त झालेत. त्यांनी हैदराबाद- नागपूर जुन्हा महामार्ग रोखून धरलाय. आरोपीला फासावर चढवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा पवित्रा या नागरिकांनी घेतलाय.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज आज संपलीय. सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिचा मृत्यू झालाय. तीन फेब्रुवारीला विकेश नगराळे या नराधमानं पीडितेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेच्या मृत्यूची माहिती कळताच हिंगणघाट शहरात वर्ध्यातील काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दुकानं बंद कऱण्याचं आवाहन केलंय. काही प्रमाणात दुकानं बंदही करण्यात आलीय. दरम्यान, हिंगणघाट शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ज्या महाविद्यालयात हिंगणघाटची पीडिता शिकवायची, त्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पीडितेला श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाविद्यालयातील संपूर्ण वातावरण शोकसागरात बुडाल्याचं पाहायला मिळालं.

हिंगणघाटातील पीडितेच्या मृत्यूवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया -
अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, ट्विट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.


महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची ट्विटरवर प्रतिक्रिया -
माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय... महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या 'हिंसक-पुरुषी' मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया #हिंगणघाट


"त्या नराधम आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असून महिला व बालकल्याण विभागातर्फे पीडित कुटुंबाला आर्थिक मदत सुदधा मंजूर केली असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन ठोस पाऊले उचलत असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले.

हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला कोणत्या शतकातं आहोतं आपण, दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न कमी न होता वाढताहेत. बाई म्हणून तिच्या कतृत्वाच्या कहाण्यांपेक्षा अत्याचाराच्या कहाण्या होताहेत कोण जबाबदार याला कोण घेणार जबाबदारी. आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळालाय, असं ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिलीय.

हिंगणघाट घटनेतील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलय. कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करत यातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केलीय. तसेच मनाला चीड आणणारी अशी ही घटना असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, असंही ते म्हणाले आहेत. चव्हाण नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हिंगणघाट येथील मुलीचा मृत्यू दुर्दैवी आहे. आमच्या सरकारच्या वतीने आम्ही तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मुंबईतील डॉक्टर स्थानिक डॉक्टरांनीही खूप प्रयत्न केले. मी मुलीच्या वडिलांशी बोललो. आम्ही मुलीच्या कुटुंबासोबत आहोत. घरातील भावाला किंवा आणखी कोणाला तरी नोकरीत सामावून घेऊ. शासनाकडून कुटुंबाला मदत करू तसेच ज्येष्ठी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी देखील बोललो आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर चालवून लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले, डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण नियतीला मान्य नव्हतं. कोणत्याही व्यक्तीचं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. कठोर कायदे केले पाहिजेत, असा कायदा होत नाही तोपर्यंत त्या बहिणीला न्याय मिळणार नाही. राज्यात अशा घटना घडू नये यासाठी समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातमी : Hinganghat Women Ablaze | हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू

Hinganghat Burnt Teacher Death | हा मृत्यू नसून खून : खासदार सुप्रिया सुळे | ABP Majha