बीड: राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित सत्तेत असतानाही बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतोय. काही दिवसापूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीतील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले होते. आता बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची तक्रार शिवसैनिकांनी शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


बीडमधील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे संदीप क्षीरसागर यांची तक्रार केली आहे. तक्रारीमध्ये सचिन मुळूक यांनी सांगितले की, बीड मतदारसंघात शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेले विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. अन्यायकारक वर्तवणूक आम्ही सहन करणार नाही. सदर अडवलेली कामे तत्काळ शिवसेनेला द्यावीत अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी शिवसेना नेत्यांकडे  केली आहे.


गेल्या आठवड्यामध्ये बीड शहरामध्ये दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ अजित पवार यांनी केला होता. याच कार्यक्रमाच्या अगोदर शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून या विकासकामांच्या शुभारंभाचा निषेध नोंदवला होता. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमासाठी शिवसैनिकांना ही बोलवले असल्याचे सांगितले होते. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलावल्यानंतरही शिवसैनिक या कार्यक्रमाला आले नाहीत असे त्यांनी नमूद केले होते.


या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय स्वीय सहाय्यकांकडे तसेच शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाविकास आघाडी स्थापन होऊन दोन वर्षे पूर्ण झाली. विकासकामांना गती मिळावी म्हणून विकासकामे निश्चित करण्यात आली. त्या अनुषंगाने आम्ही सन 2020-2021  या आर्थिक वर्षात फेब्रुवारी 2020 च्या अर्थसंकल्पात बीड तालुक्यातील चर्हाटा व पालवण गावाला जोडणाऱ्या पुलांना मंजूरी मिळावी म्हणून औरंगाबाद चे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. सदर विनंती मान्य करून विशेष बाब म्हणून फेब्रुवारी 2020 च्या अर्थसंकल्पात या कामांना समाविष्ट करून मंजुरी दिली. ही कामे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत असा आरोप सचिन मुळूक यांनी केला आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha