त्यांचा निर्णय आश्चर्याचा धक्का आहे. आमच्या विचारांमध्ये जो काही वाद होता, तो मान्य आहे. मी जेवढे काही पक्षााचे कार्यक्रम घेतले, त्या कार्यक्रमांध्ये त्यांना निमंत्रित केलं होतं. खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे माझी जिल्हा परिषद गेली. पंचायत समिती गेली. नगरपरिषदेमध्ये बोगस कामांबाबत मी लहान काकांची तक्रार जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे वारंवार केली होती, असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.
खरंतर ज्या दिव्यांची चर्चा आहे, ते चटके कोणी दिले याबाबत आण्णांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मला शेवटपर्यंत वाटत होतं ते पवार साहेबांसोबत चर्चा करतील. खऱ्या अर्थाने कुणी कुणाला धोका दिला हे बघणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
काय आहे काका पुतण्याचा वाद?
काका-पुतणे यांचा वाद हा महाराष्ट्राला काही नवीन नाही. पुतणे संदीप क्षीरसागर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यावरून वाद पेटला होता. नाराज पुतणे संदीप क्षीरसागर यांची नाराजी वाढतच गेल्याने संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं होतं. पुतण्याला जिल्ह्यातील पक्षातील काही नेत्यांकडूनच जाणीवपूर्वक बळ दिलं जात असल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळं जयदत्त क्षीरसागर नाराज होते.
राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा पक्षाला रामराम, शिवसेनेच्या वाटेवर
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आदल्याच दिवशी बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची घुसमट बाहेर आली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला रामराम ठोकत असल्याचा निर्णय क्षीरसागर यांनी जाहीर केला आहे. जयदत्त क्षीरसागर आजच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मिलिंद नार्वेकरांनी क्षीरसागर यांची भेट घेतली.
पक्षामध्ये होणाऱ्या अवहेलनेमुळे बऱ्याच दिवसांपासून घुसमट सुरु होती. ती कुठपर्यंत सहन करायची, हा प्रश्न कार्यकर्तेही विचारत होते. जिथे स्वाभिमानाला ठेच पोहचते तिथे राहण्यात स्वारस्य नव्हतं, अशा भावना जयदत्त क्षीरसागर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
'वादळात दिव्याचं रक्षण केलं, आता दिव्यानेच हात पोळले' अशा शब्दात राष्ट्रवादीवर निशाणा साधतानाच 'हेचि फळ काय मम तपाला' असा काव्यात्मक सवालही क्षीरसागर यांनी उपस्थित केला. नाराजीबद्दल शरद पवारांशी खुलेपणाने चर्चा केल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.