बीड : बीडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद टोकाला गेला आहे. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.


काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार उभे केले आहेत. राजुऱ्यात मतदानादरम्यान माझ्या उमेदवाराला जयदत्त क्षीरसागर यांनी धमकी दिली, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे संदीप यांनी तक्रार करताना कथित धमकीची ऑडिओ क्लिपही सादर केली आहे. त्यामुळे जयदत्त यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. मात्र आपण कुणालाही धमकी दिली नसल्याचा दावा जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे.

'मी माझ्या राजकीय कारकीर्दीत अशा धमक्या कोणालाच दिल्या नाहीत. त्या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याची माहिती मला मिळाली, तेव्हा मी त्यांना फोनवरुन समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही क्लिप तोडून लोकांमध्ये माझ्याविरोधात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.' असं जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

माझ्या क्लिपमध्ये कुठेही मी धमकी दिलेली नाही, मी फक्त तक्रारीवरुन त्यांना फोन केला आणि कायद्याचा भंग न करता लोकशाहीचे पालन केले आहे, असा दावाही जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे.