बीड : गेवराई येथील गणेशनगरातील सरस्वती कॉलनीतील बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा आणि खून प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. घाडगे दाम्पत्याची हत्या दरोडेखोरांनीच केल्याचं उजेडात आलं असून एका संशयिताला जेरबंद करण्यात आलं आहे.


पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची गोपनीय चौकशी करण्यात आली. यात त्याने आणखी चार साथीदार असल्याचं सांगितलं. जवळपास पाच दिवसांनी पोलिसांना या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले आहेत. संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

दरोडेखोर मद्याच्या नशेत दरोड्याच्या उद्देशाने घाडगे यांच्या घराजवळ गेले. दरवाजा खटखटला. अलका घाडगे यांनी दरवाजा उघडताक्षणी त्यांच्यावर धारदर शस्त्राने वार केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आदीनाथ घाडगे यांना जाग आली. त्यांच्यावरही हल्ला चढवला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुली जाग्या झाल्या. त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर घाडगे दाम्पत्य गतप्राण झाल्याचं लक्षात दरोडेखोर भयभीत झाले.

काय आहे प्रकरण?

बीडमधील गेवराईत बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. या दरोड्यात दरोडेखोरांनी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली, तर दोन्ही मुलींवरही धारदार शस्त्राने हल्ला करुन लाखोंचा ऐवज लंपास केला.

गेवराई शहरातील सरस्वती कॉलनीत ही घटना घडली. भवानी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या घरावर 23 ऑगस्ट रोजी पहाटे सशस्त्र दरोडा पडला.

पहाटे साडे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावला. घाडगे यांच्या पत्नी अलका (वय 42 वर्ष) यांनी दरवाजा उघडल्यानंतर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर आदिनाथ घाडगे, घरात बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (वय 22 वर्ष) आणि दुसरी मुलगी स्वाती घाडगे (वय 18 वर्ष) यांच्यावरही हल्ला केला.

संबंधित बातमी : बीडमध्ये बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, दाम्पत्याची हत्या