वैजनाथ सोळंके आणि गणेश कदम यांच्यातील आपापसातील वादातून गणेश कदमने वैजनाथ सोळंकेंवर हल्ला केला. याप्रकरणी धर्माळा, ता. धारुर येथील वैजनाथ सोळंके यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आज सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ते घरासमोर थांबले असताना गणेश कदम हा मद्यधुंद अवस्थेत कोयता घेऊन त्यांच्या घरासमोर आला आणि गोंधळ घालू लागला. वैजनाथ यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता गणेशने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात वैजनाथ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांनतर गणेशने वैजनाथ यांची आणि आणखी एक अशा दोन दुचाकी फोडल्या. यावेळी वैजनाथ यांचे वडील आणि शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत भांडण सोडविले. याप्रकरणी वैजनाथ सोळंके यांच्या फिर्यादीवरून गणेश कदम याच्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वैजनाथ सोळंके आणि गणेश कदम हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्याचे समजते.
दरम्यान, सारिका सोनवणे यांनी सुखरूप असल्याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. मी सुखरूप आहे. या कठीण प्रसंगी माझ्या आणि आपले उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी असलेल्या बीड जिल्ह्यातील तसेच सबंध महाराष्ट्रातील लोकशाहीवादी नागरिकांचे आभार. मात्र, आपण कोणीही काळजी करू नका मी सुखरुप आहे. आपणा सर्वांची साथ आहे तोपर्यंत जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवत राहील, सर्वसामान्यांसाठी लढत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हा प्रकार सुरु असताना तिथपासून 150 फूट अंतरावर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका यांची कॉर्नर बैठक सुरु होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गणेश कदम याने दारूच्या नशेत आणि वैयक्तिक वादातून केलेले कृत्य आहे. घडलेली घटना ही सभेच्या ठिकाणापासून किमान शंभर ते दीडशे फूट अंतरावर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे सारिका बजरंग सोनवणे यांच्यावर वार करण्याचा प्रकार झालेला नाही, असे अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अजित बोराडे यांनी सांगितले आहे. निवडणूक कालावधीमध्ये अशा अफवा पसरवल्या जाणे हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घातक आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धारूर येथे गुन्हा दाखल झालेला असून लवकरात लवकर आरोपीस अटक करण्यात येईल, असे बोराडे यांनी सांगितले.