बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई गावासह आजूबाजूच्या वस्ती, तांड्यांना पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत अज्ञात माथेफिरुने दोन बाटल्या किटक नाशक टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी लोक गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अज्ञात माथेफिरुच्या भयंकर मानसिकतेमुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील नागरिकांसाठी आणि परिसरातील वस्ती, तांड्यांवरील नागरिकांसाठी गावातील रावसाहेब शिंदे यांच्या शेतातील विहिरीतून पाणी पुरवठा होतो. सदर विहिरीचे शासनाने अधिग्रहण केले असून भर उन्हाळ्यात या विहिरीतून टँकर भरले जातात. अद्यापही या विहिरीतील पाण्याने वाडी, वस्ती, तांड्यावरील लोकांची तहान भागवली जात आहे. परंतु गुरुवारी रात्री एका अज्ञात माथेफिरुने या विहिरीत किटक नाशकाचे दोन डबे ओतले. त्याचबरोबर विहिरीतून पाणी काढणार्‍या मोटारच्या वॉल्वमध्येही किटक नाशक टाकले. विहिरीतील पाण्यात किटकनाशक टाकल्याचे वृत्त मिळताच प्रशासनाने या विहिरीतील संपूर्ण पाणी बाहेर काढून विहीर स्वच्छ करुन घेतली आहे. तसेच घटनास्थळी आढळलेल्या किटकनाशकाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे दुष्कृत्य कोणी केले? याची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. या विहिरीत औषध टाकल्याने आज गावातील प्यायला पाणी नाही. त्यामुळे लोकांना खूप दूरवरुन पाणी आणावे लागतील.