Beed  OBC Sabha : बीडमध्ये (Beed) आज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची महाएल्गार सभा होत असून, दुपारी चार वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. आयोजकांनी या सभेसाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना देखील आमंत्रण दिलं आहे. मात्र, या सभेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उपस्थित राहणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बीड शहरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी छगन भुजबळ यांच्यासह इतर ओबीसी नेते देखील उपस्थित राहणार आहेत. सोबतच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आमंत्रण दिल असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची या सभेत उपस्थिती असणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


आतापर्यंत छगन भुजबळ यांच्या जेवढ्या महाएल्गार सभा झाल्या आहेत, त्या सभेला देखील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आमंत्रण दिले होते. मात्र, एकाही सभेला त्यांची उपस्थिती नव्हती. आता या दोन्ही नेत्यांच्या होमग्राउंडवरच म्हणजेच बीड शहरात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता बीडमधील या सभेला मुंडे बहीण-भाऊ उपस्थित राहतील का? हे पहावं लागणार आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाची घोषणा बीडच्या सभेतून केली होती. त्यानंतर ओबीसी नेत्यांकडून देखील याच काळात मुंबईत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आज बीडमध्ये जी ओबीसी सभा होणार आहे, या सभेतून छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाच्या मुंबईतील आंदोलनाची काही घोषणा करणार का? हे पाहणं देखील महत्वाचे असणार आहे. 


जेथून जरांगेंनी मुंबई आंदोलनाची घोषणा केली तिथेच ओबीसी सभा 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करणार असून, यासाठी 20 जानेवारीला आपण आंतरवाली सराटी गावातून पायी मुंबईकडे निघणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या मुंबई आंदोलनाची घोषणा मनोज जरांगे यांनी बीडच्या सभेतून केली होती. आता याच बीड शहरात आज ओबीसी सभा होत असून, छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती येथे असणार आहे. त्यामुळे आजच्या सभेतून भुजबळ नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


आजच्या ओबीसी सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आजच्या सभेला मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान बीड जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या बीडमधील ओबीसी सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News : बीडच्या सभेला यायचं असेल तर भुजबळांनी राजीनामा देऊन यावं, ओबीसी महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांचा विरोध