Atal Setu Bridge : महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link) प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकार्पण झालं. हा 'अटल सेतू' शनिवार 13 जानेवारीच्या सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएच्यावतीने कळविण्यात आले आहे.
एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे. तब्बल दोन तासांचा वेळ वाचणार आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी हा पूल मैलाचा दगड असेल. अटल सेतूवरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, त्याआधी तुम्हाला याआधी काही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.
कोणत्या वाहनांना नो एंट्री -
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल सेतूवरुन दुचाकी वाहनं, ऑटो रिक्षा, टॅक्टर , मोपेड, तीन चाकी टेम्पो, कमी वेगानं चालणारी वाहनं, बैलगाडी अथवा घोडागाडी, मुंबईकडे जाणारी मल्टी एक्सल जड वाहनं, ट्रक आणि बसला जाण्यास परवानगी नसेल.
कोणत्या वाहनांना परवानगी?
कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, लहान ट्रक.
वेगमर्यादा काय ?
अटल सेतू महामार्गाची रचना ताशी 100 किमी वेगमर्यादेनुसार करण्यात आली आहे. पूर्वी महामार्गावरून ताशी 80 किमी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. आता सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला झाला असून ताशी 100 किमी अशी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
कॅमेऱ्यांचा वॉच -
अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा (Intelligent Traffic Management) सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक 100 मीटरवर अद्ययावत सीसीटिव्ही कॅमेरे बसलेले आहेत. एकूण 130 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 190 आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित थर्मल कॅमेरे, 36 अंडर ब्रिज कॅमेरे, 12 सेक्शन स्पीड आणि 22 स्पॉट स्पीड कॅमेरे यांचा समावेश आहे.
अटल सेतूवरील टोल दर किती? (Atal Setu Toll Price)
वाहन प्रकार | एकेरी प्रवास | परतीचा प्रवास (Return Journey) | दैनंदिन पास | मासिक पास |
कार | 250 रुपये | 375 रुपये | 625 रुपये | 12,500 रुपये |
एलसीव्ही/ मिनी बस | 400 रुपये | 600 रुपये | 1000 रुपये | 20,000 रुपये |
बस/ 2 एक्सल ट्रक | 830 रुपये | 1245 रुपये | 2075 रुपये | 41, 500 रुपये |
एमएव्ही 3 एक्सल वाहनं | 905 रुपये | 1360 रुपये | 2265 रुपये | 45, 250 रुपये |
एमएव्ही 4 ते 6 एक्सल | 1300 रुपये | 1950 रुपये | 3250 रुपये | 65, 000 रुपये |
मल्टीएक्सल वाहने | 1580 रुपये | 2370 रुपये | 3950 रुपये | 79, 000 रुपये |
कसा आहे पूल? (Mumbai Trans Harbour Link- MTHL Key Features)
- MTHL पुलाची एकूण लांबी 21.8 किमी आहे ज्यामध्ये समुद्रावरील लांबी 16.50 किमी आहे आणि जमिनीवरील भाग 5.5 किमी आहे.
- या सी लिंकमध्ये दोन्ही बाजूला 6-लेन (3+3 लेन) महामार्ग+1 आपत्कालीन लेन आहे.
- मुंबईतील शिवडी, शिवाजी-नगर आणि जासई येथे SH-54 आणि NH-348 वर चिर्ले येथे इंटरचेंज आहेत.
- 90 मी ते 180 मीटर लांबीचे 7 ओएसडी (ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक) स्पॅन आहेत जे भारतात प्रथमच पुलावर वापरले गेले आहेत.
- या पुलावरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. तर रिटर्न प्रवासासाठी 375 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा हायवेशी वेगवान दळवळण शक्य होईल.
- मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे.
- इंधनाची बचत होईल. वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच नवीन गुंतवणूक होऊन रोजगार वाढेल.
- ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता
- प्रत्येक 100 मीटरवर अद्ययावत सीसीटिव्ही कॅमेरे बसलेले आहेत. एकूण 130 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
- सध्या फ्री वे आणि शिवडी येथून या पुलावर जाता येते. भविष्यात कोस्टल रोडला देखील जोडण्यात येईल.
- रस्त्याचे बांधकाम उत्कृष्ठ दर्जाचे आहे. प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना उत्तम आहेत.
- फ्लेमिंगो जवळून जात असलेल्या पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर लावण्यात आले आहेत. त्यामुळे फ्लेमिंगो आणि इतर कांदळवनातील वन्य जीवांना त्रास कमी होईल.
- विशिष्ट अंतरावर स्पिडोमीटर्स लावण्यात आल्याने वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा लक्षात येते.
- पुलावर काही ठिकाणी 100 किमी प्रतितास तर काही ठिकाणी 80 आणि 60 किमी प्रतितास अशी वेग मर्यादा आहे.
- या पुलावरून प्रवास करताना आपल्याला टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता आहे.