Beed News Update : दरवर्षी उन्हाळा आला की बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात होते. एप्रिल-मे मध्ये तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. परंतु, या वर्षी बीड वासियांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा अद्यापपर्यंत बीड जिल्ह्यात टँकरचा एकही प्रस्ताव आलेला नाही. मागच्या वर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली. याचाच परिणाम म्हणजे बीड जिल्ह्यात अद्याप कोठेही टँकरची मागणी झालेली नाही.
उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी उपाय योजना करण्यात बीड जिल्हा प्रशासन व्यस्त असायचे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा आराखडा मांडला जायचा. मात्र, मागच्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणीसाठा चांगल्या स्थितीत आहे.
दुष्काळी बीड जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासूनच पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागते. यंदा मात्र एप्रिलच्या मध्यापर्यंत टँकर मागणीसाठीचा एकही प्रस्ताव स्थानिक पातळीवरून जिल्हा प्रशासनाकडे आलेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी उद्भवलेला नाही.
बीड जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून चर्चेत असतो. मागील दहा वर्षात दुष्काळी उपाययोजनांवर शासनाला या भागात अतिरिक्त पैसा खर्च करून गावोगावच्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर उपलब्ध करावे लागले. साधारण दोन ते तीन वर्षाआड बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात हीच स्थिती अनुभवावी लागते. कमी पर्जन्यमान, शेतीसाठी उपलब्ध नसलेले पाणी आणि या विवंचनेतून होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या हा विषय ही तितकाच गंभीर आहे.
यंदा मात्र, जिल्हा प्रशासनाला एप्रिल महिना मध्यावर आलेला असतानाही पाण्यासाठी एकही टँकर गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर पाठवावे लागलेला नाही. बीड जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिकच पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी आणि कृष्णा खोर्याअंतर्गतच्या 144 प्रकल्पांमध्ये मोठा पाणी साठा उपलब्ध झाला. आता उन्हाळा सुरू झाल्याने बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होत आहे. त्यामुळे पिण्यासाठीच्या पाण्याच्या उपशामुळे प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असला तरी तो समाधानकारक आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत जिल्ह्यात यंदा पिण्यासाठी गावोगावी टँकर सुरू करण्याची वेळ येणार नाही.
जिल्ह्यात 52.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध
पावसामुळे बीड जिल्ह्यातील गोदावरी व कृष्णा खोर्याअंतर्गतच्या 144 प्रकल्पांमध्ये सध्या 52.53 टक्के उपलब्ध झाला आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पात 328 दलघमी (दशलक्ष घनमीटर) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच केज तालुक्यातील मांजरा या दुसर्या मोठ्या प्रकल्पातही सध्या 176.963 दलघमी पाणीसाठा आहे. या दोन प्रकल्पात मिळून 63.31 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यातील बीड व परळी विभागातील 16 मध्यम प्रकल्पात 51.37 टक्के तर 126 लघु प्रकल्पात 32.32 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात सर्व 144 प्रकल्पांच्या एकूण पाणीसाठ्याची टक्केवारी सद्यस्थितीत 52.53 टक्के इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने तुर्तास तरी पाण्याची अडचण नाही.