बीड : येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार असल्याचं शिवशक्ती पक्षाच्या करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे बीडकरांना 2024 साली नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळणार आहे. करुणा शर्मा या आता कोल्हापूर पोटनिवडणूक लढवत आहेत. 


करुणा शर्मा म्हणाल्या की, येत्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा ही निवडणूक शंभर टक्के होणार. काँग्रेसला जर बिनविरोध निवडणूक करायची असेल तर त्यांनी मला पाठिंबा द्यावा. माझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा कोणी आवाज उठवला नाही. आता पुन्हा एकदा संधी आहे, लोकांनी मला साथ द्यावी. आता कोल्हापुरातून निवडून आले तरीसुद्धा मी बीडमध्ये निवडणूक लढवणारच.


कोल्हापूर पोटनिवडणूक लढवणार
धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत त्या शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असतील. करुणा शर्मा यांनीच हा पक्ष स्थापन केलेला आहे. गेले काही दिवस पक्षातर्फे कोण उमेदवार असेल यावर मंथन झालं आणि अखेरीस करुणा शर्मा यांनी स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष स्थापनेनंतर थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उतरल्यानं करुणा शर्मा यांची आणि त्यांच्या पक्षाचीही चर्चा होत आहे. 


धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?
करुणा शर्मांची बहीण रेणू शर्मा यांनी सर्वात गेल्या वर्षी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली, तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली.


करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मा यांच्यासह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालयाने करुणा शर्मांना जामिन मंजूर केला.


महत्त्वाच्या बातम्या: