बीड: राज्यभर महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम अगदी जोरदार सुरू आहे. ज्या वीज ग्राहकाकडून वीज बिलाची भरणा नियमित होत नाही अशा ग्राहकांवर ती कारवाई होत आहेच, मात्र ग्राहकांकडून वीज बिल वेळेवर वसूल न करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा आता कारवाईचा बडगा उपसता जातोय. वीज बिल वसुलीत दिरंगाई करून कामात अनियमितता असणाऱ्या मराठवाड्यातील तीन अधीक्षक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर तीन अभियंत्यांना निलंबित केले आहे.


यामध्ये जालना उपविभाग उप-कार्यकारी अभियंता, तेलगांव उपविभाग बीडचे उप-कार्यकारी अभियंता आणि पाथरी उपविभाग परभणीचे उप-कार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्यात आले आहे.


महावितरणकडून थकबाकीसह चालू  वीज बिल वसूल करण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. बिले न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात येत आहे. वीज बिल वसुलीत दिरंगाई करून कामात अनियमितता करणाऱ्या कामचुकार तीन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच तीन अधीक्षक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त तीन अधीक्षक अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई केली असून कामचुकार लाईनमनवरही मोठया प्रमाणात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.


वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून वीज पुरवठा खंडीत करण्यासह मीटर वायर जप्त करणे आदी कारवाई करण्यात येत आहे. 


महावितरणच्या  'हर घर दस्तक' मोहीमेला चांगला प्रतिसाद
मराठवाड्यात सर्व  वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर आहे. त्यामुळे महावितरणला प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत  आहे. त्यासाठी  वीज बिल वसुलीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी वीज  ग्राहकांच्या घरोघरी जाऊन ग्राहक थकबाकीत तर नाही ना, हे पाहिले जात आहे. ग्राहक आपले वीज बिल भरले आहे का, वीज बिल भरले नसेल तर ग्राहकाकडून वीज बिलाची रक्कम घेवून मोबाईलमधून महावितरणच्या एम्प्लॉई ऍप च्या माध्यमातून तात्काळ भरून घेतले जात आहे. वीज कर्मचारी दररोज किमान वीस ग्राहकांकडून वीज बिल वसूल करत आहेत. जे ग्राहक थकबाकीत आहेत. त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यासह वारंवार सांगून, नोटीस बजावूनही बिले न भरल्यास मिटर वायर जप्त करण्यात  येत आहेत. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांना वीज बिलाची पैसे न भरल्यास अंधारात रहावे लागत आहे. 


महावितरणची वीज बिल वसूली व ग्राहकसेवा संदर्भात महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले हे मराठवाडयातील अभियंत्यांची दर आठवडयाला व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे बैठक घेवून आढावा घेत आहेत. तसेच  वीज बिल वसुलीसाठी क्षेत्रिय ठिकाणी स्वत: रस्त्यावर उतरून वसूली करत आहेत. बैठकीत  दरमहा थकबाकीसह चालू वीज बिल वसूलीचे उद्दिष्ट्य पूर्ण न करणाऱ्या अभियंत्यांना कामात कसूर करणे, वीज बिल वसुलीत दिरंगाई करणे, वीज गळती कमी न करणे, खंडीत वीज पुरवठा पूर्ववत न करणे, आपल्या अधिनिस्त कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने थकबाकीत वाढ होणे, ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करणे, विद्युत वाहिनी व रोहित्रांची देखभाल करणे इत्यादी कारणावरून आणि  वीज बिल वसुलीच्या उद्दिष्टांची पूर्तता न केल्याने  मराठवाडयातील तीन अभियंत्यांना त्यांच्या क्षेत्रिय अधीक्षक अभियंत्यांनी निलंबित केले आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha