बीड: घरांमध्ये कांदा चिरताना आईच्या डोळ्यातून पाणी आले म्हणून एका सातवीत शिकणाऱ्या मुलाने  आपल्या आईच्या डोळ्यातील पाणी थांबवण्यासाठी चक्क एक स्मार्ट चाकू बनवलाय. आता कांदा चिरताना तिच्या डोळ्यात पाणी येत नाही. बीड जिल्ह्यातल्या कुर्ला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ओमकार शिंदेने ही कमाल केली आहे. त्यासाठी भाऊसाहेब राणे या शिक्षकांची त्याला मदत झाली आहे.


ओंकारने बालवयातच एक अनोखं  संशोधन केलंय. त्याची आई घरात कांदा चिरत असताना तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. ते पाहून ओंकारला प्रश्न पडला की आईच्या डोळ्यात कांदा चिरताना पाणी येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. त्यासाठी त्याने एक शक्कल लढवली चाकूच्या मुठीवर एक मोटार लावून तिला पाते बसवले आणि एक स्मार्ट चाकू बनवला.


पूर्वी घरात कांदा कापताना ओमकारच्या आईची अवस्था अशी व्हायची की, त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागायच्या. मात्र आपल्या मुलांना केलेल्या संशोधनामुळे त्यांच्या हातात आता स्मार्ट चाकू आलाय आणि या चाकूने कांदा कापताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत नसल्याचं त्या सांगतायत. निरक्षर असलेल्या आई-वडिलांना मुलाने केलेल्या संशोधनाच कौतुक वाटतंय


हा चाकू तयार करण्यासाठी ओंकारला 160 रुपये एवढा खर्च झाला आहे. त्यासाठी प्लास्टिकची पाईप, ड्रोन मोटार चार्ज होणारी बॅटरी आणि बंद चालू करण्यासाठी एक स्वीच या साहित्यापासून हा चाकू तयार केला आहे. मोबाईलच्या चार्जरने चार्जिंग होणाऱ्या या पाइपच्या मुठीवर वेगवेगळ्या प्रकारचे चाकू बसवता येतात.


कुर्ला येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केल आहे आणि याचीच दखल घेऊन आता ओमकारच्या या प्रयोगाची केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दखल घेतली असून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनासाठी त्याची निवड झाली आहे.


गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात आणि ह्याची प्रचिती ओमकार शिंदे यांनी लावलेल्या या छोट्याशा प्रयोगातून येते आईच्या डोळ्यातून येणारे पाणी थांबविण्यासाठी त्याने छोटासा प्रयोग जरी केला असला तरी या प्रयोगात सोबत आपल्या आईच्या प्रति असलेली मुलाची संवेदना सुद्धा निश्चितच पाहायला मिळते 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha