Beed News Update : बीडमध्ये पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा वाद उफाळला असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षाने भाजपसोबत जाण्याचा कट रचल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. महबूब शेख यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून माजी मंत्री क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 


शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "बीडमधील शिरूर कासार नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या पराभवासाठी शिवसेना आणि भाजपची छुपी युती आज उघड झाली आहे. आज भाजपसोबत अधिकृत गटात शिवसेना नगरसेवक गेले आहेत. त्यांच्या या भाजपसोबत जाण्याने निवडणुकीच्या पूर्वीच असलेल्या छुप्या युतीचे कारस्थान जनतेच्या समोर आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना कार्यकर्त्यांच्या समोर उघड झाले आहे. यांच्या स्वार्थी छुप्या युतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा जागा पाडण्याचे काम केले आहे.


"पडद्यामागचे कारस्थान आज शिवसैनिकांच्या समोर उघडे पडलं हे बरं झालं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कष्ट घेत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील स्वार्थी नेते आणि माजी मंत्री निवडणुकीच्या पूर्वीच भाजपच्या माजी मंत्र्यांसोबत छुपी युती करत होते. आज हेच अतिनिष्ठावंत लोक निकालाच्या नंतर उघड भाजपसोबत जात नवा संसार थाटत आहेत, असा आरोप शेख यांनी केला आहे. 


"राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी दोन माजी मंत्र्यांना एकत्रित यावे लागले. चोरी छुपी करत शिवसेनेचा विचार डावलून गद्दारी केली. याचा विचार शिवसेना करेल का? हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगाची आठवण शिवसेना 'अंधारात साटेलोटे करून, उजेडात मोथूर लावणाऱ्या बीडच्या नेत्याला करुन देणार का? हा प्रश्न पडला आहे, असे शेख यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.


महत्वाच्या बातम्या