Beed Nagar Panchayat Election Result : बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच नगरपंचायतसाठी आज मतमोजणी झाली. त्यामध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर यातील नगरपंचायती या भाजपच्या ताब्यात राहिल्या तर केज नगरपंचायत काँग्रेसच्या हातून निसटली आहे.. विशेष म्हणजे काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्या गटात या निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या नंबरवर आहे.शिरूर नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांचा ही दारुण पराभव झाला आहे. पुन्हा एकदा शिरूर नगरपंचायत ही भाजपच्या ताब्यात राहिली आहे तिथे सुरेश धस गटाने मेहबूब शेख गटाचा पराभव केला आहे. वडवणी नगरपंचायत मात्र भाजपच्या हातून जाताना पाहायला मिळतेय. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवले आहे.
आष्टी नगरपंचायत निकाल ( भाजप विजय)
भाजप – 15
शिवसेना –
राष्ट्रवादी – 2
काँग्रेस –
इतर – 00
शिरूर कासार नगरपंचायत ( भाजप विजयी)
भाजप- 11
राष्ट्रवादी- 4
शिवसेना- 2
पाटोदा नगरपंचायत निकाल ( भाजप विजयी)
भाजप – 10
शिवसेना –
राष्ट्रवादी –1
काँग्रेस –1
इतर –5
वडवणी नगरपंचायत निकाल ( राष्ट्रवादी विजयी)
भाजप- 8
राष्ट्रवादी- 6
राष्ट्रवादी पुरस्कृत -3
केज नगरपंचायत निकाल ( जनविकास आघाडी आघाडीवर)
काँग्रेस- 3
राष्ट्रवादी- 5
जनविकास आघाडी- 8
स्वाभिमानी -1
शिवसेना-
इतर
खासदार रजनी पाटील, बजरंग सोनवणे, मेहबूब शेख यांना धक्का, सुरेश धस यांचे वर्चस्व
नगरपंचायत निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसरीकडे खा. रजनी पाटील, आमदार सुरेश धस आणि महेबूब शेख यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीत भाजपने वर्चस्व कायम राखले आहे. राष्ट्रवादीला केवळ वडवणी नगरपंचायत मध्ये विजय मिळविता आले. तर सर्वात मोठा धक्का खा. रजनी पाटील यांना बसला आहे. केज मध्ये केवळ काँग्रेस ला 3 जागांवर विजय मिळविता आला. शिवाय राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनाही या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. त्यांची कन्या हर्षदा सोनवणे यांचाही दारुण पराभव झाला आहे. राष्ट्रवादी नेते मेहबूब शेख यांनाही या निवडणुकीत जबर धक्का बसला आहे. आष्टी-पाटोदा-शिरूर नगरपंचायतमध्ये मात्र आमदार सुरेश धस यांनी त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे.
काय म्हणाले सुरेश धस
बीड जिल्ह्यातल्या आष्टी पाटोदा आणि शिरूर या नगरपंचायती वर सुरेश धस यांनी पुन्हा आपली सत्ता कायम केली आहे पंकजा मुंडे पालकमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये त्यांनी भरपूर निधी या नगरपंचायतीच्या विकासासाठी दिला होता आणि त्यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास पुन्हा ठेवला आणि आम्ही या तीन नगरपंचायतीमध्ये बहुमताने निवडून आलो आहोत. प्रचारामध्ये राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरचे नेते आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी येऊन सभा घेत होते मात्र जनता कायम आमच्या बाजूने उभी आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो आणि त्यामुळेच लोक आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. या निवडणुकीमध्ये माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. प्रचार करताना माझ्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन काही नेत्यांनी भाषणं केली आणि याच आरोपाला आज जनतेने उत्तर दिलं आहे. ज्या लोकांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले होते त्या फक्त ढगातल्या गोळ्या होत्या हे आता या निकालातून दिसून आलं आहे.
काय म्हणाल्या रजनी पाटील
केज नगर पंचायतीचा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. गेली दहा वर्षे आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. यापुढेही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण जनतेच्या कायम सेवेत असू. निकाल हा शेवटी निकाल असतो, त्यापासून बोध घेऊन आम्ही कुठे कमी पडलो? याबाबत निश्चित विचार करून जनसेवेत राहू. -खा.रजनीताई पाटील
इतर महत्वाच्या बातम्या