Nagar Panchayat Elections 2022 Result : राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये अत्यंत्य प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या कोकणातील वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीचे निकाल देखील हाती आले आहेत. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोन नगपंचायतीत भाजप विरुद्ध शिवसेना असाच थेट सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. यामध्ये वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे, तर कुडाळ नगपंचायतीत मात्र भाजपला अपेक्षीत यश मिळवता आले नाही.
सिंदुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात होती. या निवडणुकीत त्यांनी विशेष लक्ष घातले होते. त्याप्रमाणे वैभववाडी नगरपंचायतीवर नारायण राणेंच्या गटाने वर्चस्व राखले आहे. वैभववाडी नगरपंचायतीत 17 जागांपैकी भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 5 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांच्या वाट्याला दोन जागा मिळाल्या आहेत. वैभववाडी नगरपंचायतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खाते खोलता आले नाही.
दुसरीकडे नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेल्या कुडाळ नगपंचायतीत 17 जागांपैकी भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना 7 जागा तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. जरी सर्वांत जास्त जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी राणेंना तिथे एकहाती सत्ता मिळवा आली नाही. या नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार हे सध्या सांगता येत नाही. कारण काँग्रेसच्या पाठिंबा कोणाला मिळणार यावर सत्तेची गणित अवलंबून राहणार आहेत. मात्र, राणेंना कुडाळमध्ये अपेक्षीत यश मिळाले नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, कुडाळात विजयानंतर शिवसेनेने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली काढली. या रॅलीला भाजपने विरोध केल्याचे पाहायला मिळाले. भाजप कार्यालयाबाहेर अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहायला मिलाले. राणे समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी वैभव नाईक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्याचे पाहायला मिळाले.