बीड : काही वेळा एखादी घटना ऐकून तुम्हाला देवाचे आभारही मानावेसे वाटतात, मात्र त्याचवेळी क्रूर नियतीच्या नावानं लाखोल्याही वाहाव्याशा वाटतात. बीडमधील चारदरीच्या डोंगरावर वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तर या मृत्यूच्या तांडवातून पाच महिन्यांची चिमुकली सुखरुप बचावली.


सोमवारी आसाराम आणि उषा आघाव हे दाम्पत्य आठ जणांसोबत शेतामध्ये ज्वारी काढण्याचं काम करत होतं. दुपारी सगळे जण जेवणासाठी झाडाखाली बसले होते. अचानक वीजेच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. त्याचवेळी वीज कोसळून आसाराम आणि उषा यांच्यासह पाच जणांचा जागीच कोळसा झाला.

बाळाला पाऊस लागू नये म्हणून उषानं मुलीच्या डोक्यावरती टोपली ठेवली होती. हीच टोपली तिच्यासाठी कवचकुंडल ठरली. लाकडाच्या टोपलीमुळे पाच महिन्यांच्या कोवळ्या जीवाच्या केसाला धक्काही लागला नाही.

या अपघातामुळे पाच घरांमध्ये कायमचा अंधार पडला आहे. विशेष म्हणजे यात मृत्यू पावलेल्या पाचही जणांचं वय हे 25 ते 30 वर्षांच्या घरात होतं. मागच्या 40 वर्षांत या चार दरीमध्ये अशी घटना घडली नव्हती.

आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे चिमुकलीच्या डोक्यावरुन छत्र हरपलं. एकाच सरणावरती उषा आणि रघुनाथ यांना अग्नि देण्यात आला. आसाराम आणि उषा यांच्या दोन मुली आणि एक मुलगा पोरका झाला. वृद्ध आई शिवाय या कुटुंबात आता कोणीही वडिलधारं उरलं नाही.