बीड : एखाद्या चित्रपटातच शोभावा असा थरार बीडमध्ये केज-अंबाजोगाई रस्त्यावर घडला. लुटीच्या उद्देशाने मंगळवारच्या रात्री दोघा चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याला धडक दिली. दागिन्यांसह पळ काढणाऱ्या चोरट्यांचा तरुणांनी पाठलाग सुरु केला. एक चोरटा विहिरीत पडल्यामुळे हाती लागला, तर दुसऱ्याला डोंगरमाळावरुन ताब्यात घेण्यात आलं. दुर्दैवाने या संपूर्ण प्रकरणात कुंबेफळमधील एका निष्पाप तरुण सराफा व्यापाऱ्याचा नाहक बळी गेला.


केज तालुक्यातील कुंबेफळमध्ये राहणाऱ्या विकास थोरात यांचं केज शहरात 'कृष्णाई ज्वेलर्स' हे सराफा दुकान आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करुन सोनं घेऊन दुचाकीवरुन गावाकडे निघाले होते. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चौघांनी त्यांचा कारमधून पाठलाग सुरु केला.

केज-अंबाजोगाई रस्त्यावरील माऊली जिनिंगसमोर थोरात आले असता, चोरट्यांनी आपल्या कारने धडक देऊन थोरात यांना बाईकवरुन खाली पाडलं. या धडकेत विकास थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील चोरट्यांनी त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने असलेली पिशवी घेऊन धनेगावच्या दिशेने पळ काढला.

मयत विकास थोरात

घटनास्थळी उपस्थित असलेल्या अमोल थोरात यांनी प्रसंगावधान राखत कारचा नंबर त्यांच्या मित्र परिवाराला फोन करुन कळवला. फोनवरील माहितीच्या आधारे गाडीवर लक्ष ठेवण्यासाठी धनेगाव कँप परिसरात थांबलेले तरुण निघाले. त्यांना एक कार बंद पडलेली दिसली. चौकशी करण्यासाठी ते कारजवळ गेले, तेव्हा कारच्या डाव्या बाजूला धडक दिल्याचे निशाण त्यांना दिसलं.

विकास थोरात यांना धडक देऊन आलेली हीच कार असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी ‘सोने कुठे आहे?’ असा थेट सवाल करत गाडीची झडती घेतली असता गाडीत दागिन्यांची पिशवी आढळून आली. गर्दी वाढत असल्याचं पाहून गाडीतील तिघांनी पोबारा केला तर एक जण पळून जात असताना विहिरीत पडला.

विहिरीत पडलेल्या चोरट्याकडे रिव्हॉल्वर असून त्याद्वारे तो धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं तरुणांनी सांगितले. तरुणांनी ताबडतोब युसुफ वडगाव पोलिसांना घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत विहिरीत दोर सोडून आरोपी चोराला ताब्यात घेतलं. काही वेळातच परिसरातील माळावरुन आणखी एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला.