पुणे/मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवड करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटलांनी या पुस्तकांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
या पुस्तकांमध्ये कौमार्यभग्न, पुत्र संतती, इंद्रियसुख असे आक्षेपार्ह आणि शालेय विद्यार्थ्यांना जड जातील, असे शब्द असल्याचा दावा विखेंनी केला आहे. त्यामुळे आधीच पुस्तकांच्या खरेदीवरून वादात असणारं शिक्षण खातं नव्या वादात सापडलं आहे.
खरं तर ही पुस्तकं वाचली तर त्यातली भाषा ही शालेय विद्यार्थ्यांना झेपणारी अजिबात वाटत नाही. त्यामुळे या पुस्तकांना आणि त्यातल्या मजकुराला हिरवा कंदील कुणी दिला, हा प्रश्न आहे.
20 रुपयांना मिळणारं पुस्तक 50 रुपयांना कशामुळे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत प्रकाशन ‘भारतीय विचार साधना’ यांचं जे पुस्तक 20 रूपयाला उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्क 50 रूपयात खरेदी केलं असून, या प्रकाशनाकडून तब्बल 8 कोटी 17 लाख रुपयांची खरेदी करण्यात आली, असा आरोप विखे पाटलांनी केला आहे.
पुणे येथील ‘भारतीय विचार साधने’च्या कार्यालयात ‘बाळ नचिकेत’, ‘महर्षी अत्री’ ही पुस्तके प्रत्येकी 20 रुपयाला मिळतात. सरकारने हीच पुस्तके 50 रूपयाला एक प्रत या दराने विकत घेतल्याचे सांगत विखे पाटील यांनी या पुस्तकांच्या खरेदीची पावतीच पत्रकारांसमोर सादर केली. ‘भारतीय विचार साधने’वर ही सरकारी मेहरबानी का? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणीही त्यांनी केली.