बीड: सतत दारू पिऊन कर्जबाजारी झालेल्या पित्याने कर्ज फेडण्यासाठी एक एकर जमीन विकली. याच कारणावरून बाप-लेकात झालेल्या हाणामारीत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे घडली होती. मुलाच्या खून प्रकरणी बापाला अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजारांचा दंड ठोठावला आहे.
मारहाण झाल्यानंतर त्या मुलाला अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं. त्यावेळी शवविच्छेदन करणारे शासकीय अधिकारी डॉ. विश्वजित पवार, आरोपीची पत्नी आणि मयताची आई शांताबाई आश्रूबा जाधव, प्रत्यक्षदर्शी सुबराव गुट्टे या ग्रामस्थाची साक्ष महत्वाची ठरली होती.
बापाने मुलाला दगडाने ठेचले
केज तालुक्यातील विडा या गावचा भागवत आश्रूबा जाधव हा इसम दारूच्या आहारी गेला होता. त्यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि कर्ज फेडण्यासाठी एक एकर जमीन विकली. या कारणावरून आरोपी व मयत मुलगा यशवंत यांच्यात राहत्या घरी 31 जुलै 2020 रोजी दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास भांडण झाले. यात आरोपी भागवत जाधव याने मुलगा यशवंत याच्या डोक्यामध्ये आणि तोंडावर दगडाने मारहाण केली. त्यामध्ये तो मुलगा गंभीर जखमी झाला होता.
जखमी अवस्थेतील यशवंतला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार चालू असतानाच यशवंतचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये मयताची पत्नी विजूबाई भागवत जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध केजमध्ये गुन्हा नोंद केला.
पोलीस उपनिरीक्षक एस. एम. काळे यांनी तपास करून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. हे प्रकरण जलदगतीने अंबाजोगाईच्या सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात चाललेल्या या प्रकरणात फिर्यादीतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha