बीड : बीड जिल्ह्यातील परळीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मोठ्या प्रमाणावर भावनिक झालेल्या परळीच्या रणांगणात अखेर भावाने बहिणीचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. दरम्यान मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. हा निकाल अनाकलनीय असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी शांत राहावे असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले आहे.

भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांचा हा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे.

परळीत प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या व्हिडीओसंदर्भात कथित आरोपानंतर सोशल मीडियावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता.  पंकजा मुंडे यांनी यानंतर भावनिक होत आवाहन केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र व्हिडीओ क्लिप माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे, असा भावनिक खुलासा धनंजय मुंडे यांनी दिला होता. अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले होते.

परळी मतदार संघातील लढत लक्षवेधी झाली होती. आरोप प्रत्यारोप झाल्याने निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेवटच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांना भोवळ येऊन त्या खाली पडल्या होत्या. यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून धनंजय मुंडे यांनी जे भाषण केले त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केल्यानंतर गुन्हाही दाखल झाला होता.