बीड : सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकून अनेक रुग्ण आपला जीव गमावत आहेत. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावात आता म्युकर मायकोसीस (Mucormycosis) या आजारानं डोकं वर काढलं आहे. सध्या राज्यभरात या आजाराचे दोन हजारांहून अधिक रुग्ण आहेत. विशेष म्हणजे या आजारावर उपचार करण्यासाठी बहुतेक रुग्णालयात वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही. पण या आजाराबाबत अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. 


बीडच्या अंबाजोगाईमध्ये राहणारे 64 वर्षाच्या शेख रहीम यांना 7 एप्रिलला कोरोना झाला आणि 19 एप्रिलला त्यांनी कोरोनावर मात केली. 22 एप्रिलला त्यांच्या चेहऱ्यावर म्युकर मायकोसीसची लक्षणं दिसायला लागली. हा आजार कळेपर्यंत आठवडा गेला आणि अखेर 15 दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतला. अनेक रुग्णांनी या आजारामुळे आपले डोळेही गमवावे लागले आहेत.


म्युकर मायकोसीस आजाराची लक्षणं : 



  • म्युकोर मायकोसीस एक बुरशीजन्य संसर्ग आहे. या आजारात रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

  • या बुरशीचे रोगजंतू श्वास आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. आजाराची सुरुवात नाकापासून होते. 

  • नाकात सूज आल्याने हळूहळू बंद पडायला लागते. नाकातून काळसर पदार्थ स्रवतो. 

  • त्यानंतर तो संसर्ग नाकातील रक्तवाहिनीद्वारे डोळ्यांकडे वेगाने सरकतो. 

  • नंतर डोळ्याच्या जवळील भाग बधिर होणे. डोळा बारीक होणे, सुजणे, डोळ्याची हालचाल कमी होणे आणि नजर कमी होते आणि नंतर दृष्टी पूर्णपणे जाते.

  • त्यानंतर हा आजार मेंदूकडे सरकतो आणि मेंदूत प्रादुर्भाव झाल्यामुळे रुग्णाला प्राणही गमवावे लागू शकतात. 


अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या म्युकर मायकोसीसच्या बारा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यवतमाळ लातूरहुन उपचार घेण्यासाठी रुग्ण येत आहेत. म्युकर मायकोसिस हा तसा जुनाच आजार आहे. परंतु आधी तो अभावानेच आढळायचा. मात्र, कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर जे कोरोनामुक्त झाले आणि ज्यांना डायबिटीज त्रास आहे. त्यांना या संसर्गाचा त्रास जाणवत आहे. मात्र, घाबरण्याची गरज नसून  वेळीच लक्षणं ओळखून उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. 


आजारावर उपचारासाठी सध्या कोणत्याही गाइडलाईन्स जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने अथवा केंद्रीय आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आजपर्यंत देण्यात आलेल्या नसल्यामुळे उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर ही संभ्रमात आहेत. शिवाय या रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत आहे.


म्युकर मायकोसीस या आजाराची सुरुवात हे नाकामध्ये बुरशी येऊन सुरु होते. मात्र सगळ्यात भयंकर म्हणजे ही लक्षणं सुरु झाल्यावर रुग्णाला कोणताही त्रास जाणवत नाही. त्यामुळे कोरोनातून बरं होणाऱ्या जिगरबाज रुग्णांनी रुग्णालयातून सुट्टी झाल्यावरही या आजाराच्या लक्षणांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :